“देवाभाऊ,दाढीभाऊ आणि जॅकेटभाऊ दोघे-तिघे मिळून महाराष्ट्र लुटून खाऊ” !! उद्धव ठाकरेंची खोचक शब्दांत टीका
औसा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१२ नोव्हेंबर २४ मंगळवार
उद्धव ठाकरेंनी औसा या ठिकाणी भाषण करतांना महायुतीवर कडाडून टीका केली असून उद्धव ठाकरे म्हणाले की मी ऐकले अमित शाह म्हणाले की पुन्हा सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार मग मिंध्यांना म्हणा की आता भांडी घास.अजित पवारांना म्हणावे की मिंध्यांना ती भांडी घासायला माती द्या.बसा दोघे भाजपाची भांडी घासत.मोदी पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसायला लायक नाहीत व अमित शाह हे गृहमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसायला लायक नाहीत कारण तुम्ही तुमचे काम सोडून प्रचारासाठी फिरत आहात व महाराष्ट्र आता तुमच्या थापांना कंटाळला आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.औसा या ठिकाणी उद्धव ठाकरेंची सभा पार पडली या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपावर जोरदार टीका केली.उद्धव ठाकरेला जर तुम्ही संपवले आहे तर त्याला अजून का घाबरता ? असा सवाल उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना विचारला आहे.मला सोलापूरला जायचे होते पण तिथले एअरपोर्ट बंद आहे.ही काय लोकशाही आहे का ? माझी बॅग जर तपासली जात असेल तर मोदी आणि शाह यांचीही बॅग तपासली पाहिजे.माझी येतांना बॅग तपासता तशी मोदी शाह यांची जाताना बॅग तपासा.यांना मतदान करुन आपल्या चक्रव्युहात अडकू नका.महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत असे म्हटले तर काय चुकीचे बोललो ? आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करु वगैरे पान्हा फुटला आहे.आता कशाला आठवण आली ? आम्ही केले होते शेतकऱ्यांना कर्जमुक्त.पिक वीमा मिळत नाही पण जीएसटी कचकून घेत आहेत.काही लोकांना २७ रुपयांचा चेक आला.५१ रुपयांचा चेक,१२३ रुपयांचा चेक हा यांचा पीक विमा आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
देवाभाऊ,दाढीभाऊ आणि जॅकेटभाऊ तिघे मिळून महाराष्ट्राला लुटून खाऊ हे यांचे धोरण आहे.मिंधेंनी तर ताळतंत्र सोडून दिले आहे.जाऊ तिथे खाऊ हेच त्यांचे धोरण आहे.दीड वर्षापूर्वी पंतप्रधान आले होते आणि रस्त्याच्या कामांचा शुभारंभ केला.आपण केलेल्या कामांवरच ते नारळ फोडले.ते काम किती हजार कोटींनी वाढले ते बघा. सगळे पैसे एकनाथ शिंदेंच्या कंत्राटदारांच्या खिशात जात आहेत.तुम्ही ठरवायचे आहे की तुम्ही तुमच्या मुलांचे भवितव्य दरोडेखोरांच्या हाती देणार की निष्ठावान मावळ्यांच्या हातात देणार ? महाराष्ट्र काय म्हणून ओळखला गेला पाहिजे शिवरायांचा स्वाभिमानी महाराष्ट्र की अदाणीचा लाचार महाराष्ट्र हे तुम्ही ठरवायचे आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.महाराष्ट्र दिल्लीत बसून मोदी-शहा यांना हाकता येणार नाही हे लक्षात ठेवा असेही उद्धव ठाकरेंनी औसा येथून भाजपाला ठणकावले.मोदी आणि शाह महाराष्ट्र संपवायला निघाले आहेत.महाराष्ट्र लुटण्याच्या आड कुणी येऊ शकत असेल तर ती फक्त हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे.त्यांनी शिवसेनेवर घाव नाही घातलेला तर महाराष्ट्राच्या मूळावर घाव घातला आहे अशीही टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.