बीड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१२ नोव्हेंबर २४ मंगळवार
राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे त्यामुळे सध्या महाविकास आघाडी,महायुतीसह सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून प्रचाराचा धडाका सुरु आहे.दिल्ली आणि महाराष्ट्रातील दिग्गज नेते राज्यातील विविध मतदारसंघात जाऊन प्रचारसभा घेत आहेत.या सभांच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच सर्वच नेत्यांनी जनतेला मोठमोठी आश्वासनेही दिली आहेत मात्र आश्वासन देण्यात सध्या बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आहे.भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उमेदवार सुरेश धस यांनी मतदारांना दिलेल्या एका अजब आश्वासनाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.सुरेश धस हे भाजपाकडून आष्टी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत.या पार्श्वभूमीवर ते दररोज गावोगावी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत प्रचार करत आहेत.मात्र त्यांनी एका सभेत बोलतांना शेतकऱ्यांना एक आश्वासन दिले आणि त्याचीच चर्चा संध्या रंगली आहे.“मला मतदान करा,एक डुक्कर सुद्धा जिवंत ठेवणार नाही” असे सुरेश धस यांनी म्हटले आहे त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सध्या मोठ्या प्रमाणात डुकरांची संख्या वाढली असून या डुकरांमुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे.शेती करणे सोडून द्यावे की काय ? अशा मानसिकतेमध्ये शेतकरी आहेत.आम्ही आता डुक्कर पकडण्याचा एक पिंजरा काढला आहे.याआधी पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी एक कार्यक्रम घेतला होता तेव्हा डुक्कर मारण्यासाठी एक नवाब नावाचा शूटर आणला होता ही फार मोठी अडचण आहे.याबाबत आम्ही एक मोठे आंदोलन देखील काढले होते.नवाब नावाचा शूटर आणला होता त्याने एक डुक्कर मारले मात्र तेव्हा तेथील मोर फार किर्कश आरडले तेव्हा मी म्हटले की हे बंद करा.मात्र यानंतर आमच्याकडच्या दोन इंजीनियरने ऑस्ट्रेलियामध्ये ज्या प्रकारे पिंजरा असतो ते पाहून आपल्याकडे बनवला आहे त्यामध्ये एका वेळेला ५० डुक्कर अडकू शकतात.या माध्यमातून आपल्याला डुकरांची संख्या कमी करता येईल त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की,तुम्ही मला मतदान द्या.एका वर्षांत सर्व डुक्करांचा बंदोबस्त करतो.एक डुक्कर देखील जिवंत ठेवत नाही असे सुरेश धस यांनी एका सभेत बोलताना म्हटले आहे.