अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१२ नोव्हेंबर २४ मंगळवार

“रवी राणांनी महायुतीची शिस्त पाळावी,महायुतीत मिठाचा खडा टाकू नये” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बडनेराचे आमदार रवी राणा यांना इशारा दिला आहे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील रवी राणा यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.रवी राणांच्या युतीविरोधातील कारवायांवर अजित पवारांनी ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ अशी स्थिती असल्याची टिप्पणी केली आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः रवी राणांना समजावले पाहिजे असेही पवार म्हणाले.“मागे मला आनंदराव अडसुळांनी सांगितले होते रवी राणा त्यांच्याविरोधात काम करत आहेत.आत्ताही तसेच चालले.या गोष्टी महायुतीसाठी चांगल्या नाहीत” असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,“मी सर्वांना सांगतो महायुती या विधानसभा निवडणुकीत मजबुतीने लढत आहे.युतीत कुणीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये. मी राणा परिवाराला सांगतो तुम्ही महायुतीचे घटक आहात.सरकार तुमच्या मागे उभे आहे.तुम्ही सरकार आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.आपल्या उमेदवारांना तुम्ही मदत केली पाहिजे त्यामुळेच मी तुम्हाला सांगतो.तुम्ही महायुतीची शिस्त पाळली पाहिजे.युतीत राहायचे युतीविरोधात काम करायचे हे चालणार नाही.कोणीही हे असे करता कामा नये” असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. अमरावती शहर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार) उमेदवार सुलभा खोडके यांच्या प्रचाराबाबत प्रश्न विचारल्यावर “अमरावतीची एक जागा निवडून आली नाही तर काही फरक पडणार नाही” असे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केले होते त्यावरून आता त्यांच्यावर महायुतीतील नेत्यांकडून टीका होऊ लागली आहे.रवी राणांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले,रवी राणा विनाशकाले विपरीत बुद्धी अशी त्यांची स्थिती झाल्यासारखे वागत आहेत.त्यांच्याबद्दल न बोललेले बरे.त्यांच्या अशा बोलण्यानेच लोकसभेला त्यांच्या पत्नीचा पराभव झाला.मी दोन विधानसभा निवडणुकांमध्ये रवी राणांचे समर्थन केले होते पण आता त्यांनी काय बोलावे हा त्यांचा अधिकार आहे.आम्ही आमचा उमेदवार चांगल्या मताने निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे.