गोंदिया-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ नोव्हेंबर २४ बुधवार
नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे २४ तास केवळ संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत असतात व हा हल्ला ते समोरून नव्हे तर बंद दारातून करतात.मोदी म्हणतात,आमच्याकडचे संविधान लाल रंगाचा आहे मग त्यांनी सांगावे या संविधानात फुले,आंबेडकर,भगवान बुद्ध यांचे विचार नाहीत का ? माझ्या मते मोदींना संविधानाची जाणच नाही त्यांनी संविधानाचे वाचनच केले नाही व वाचन केले असते तर संविधानाचे महत्त्व त्यांना कळले असते अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली.काल मंगळवारी गोंदिया येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.मोदींनी देशात तीन काळे कृषी कायदे आणले होते त्याविरोधात संपूर्ण देशातील शेतकरी रस्त्यावर उतरले तरीदेखील मोदी म्हणतात हे कायदे शेतकरी हिताचे आहेत.हे सरकार अंबानी आणि अदानीचे असल्याची टीकाही राहुल यांनी यावेळी केली.
दरम्यान राहुल गांधी १४ नोव्हेंबर रोजी नंदूरबार आणि नांदेड येथे तर १६ नोव्हेंबर रोजी अकोला आणि चिमूर येथे ते सभा घेणार आहेत.याआधी राहुल यांनी नागपूर,मुंबई आणि गोंदिया येथे प्रचारसभा घेतल्या आहेत त्याचप्रमाणे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हेही बुधवारी महाराष्ट्र दौऱ्यावर असून सायंकाळी ४ वाजता ते वरळी विधानसभेत प्रचारसभा घेणार आहेत व धारावी मतदारसंघात सायंकाळी ६.३० वाजता ते धारावी मतदारसंघात रोड शो घेणार आहेत.