मणिपूर हे मागील दीड वर्षापासूनच वांशिक हिंसेच्या वणव्यात होरपळते आहे.तेथे जाऊन हा वणवा विझवावा असे ना पंतप्रधानांना वाटते,ना केंद्रीय गृहमंत्र्यांना.त्यामुळे काही काळ वरकरणी शांतता दिसते परंतु एखाद्या घटनेच्या निमित्ताने कुकी आणि मैतेई या दोन समाजांत खदखदत असलेला ‘लाव्हा’ उफाळून येतो व मणिपूर परत परत हिंसेच्या वणव्यात होरपळत राहते असेही ठाकरे गटाने म्हटले आहे.परिस्थिती चिघळल्याने मणिपूरमधील सहा पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात ‘आफस्पा’ कायदा लागू करण्याची वेळ केंद्र सरकारवर आली आहे.सध्या ज्या जिरीबाम जिल्ह्यात हिंसेचा आगडोंब उसळला आहे तिथेही हा कायदा लागू करण्यात आला आहे. मणिपूरमधून ‘आफस्पा’ काढून घेतला असे मोठ्या तोंडाने सांगणाऱ्या केंद्र सरकारवर तो पुन्हा लागू करण्याची वेळ का आली ? असा प्रश्नही ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.