ढाल तलवार चिन्ह धार्मिक प्रतिकाशी मिळते जुळते असल्याने निवडणूकीसाठी वापर करू नये
सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रणजीत सिंह कामठेकर यांचा चिन्हाबाबत आक्षेप
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राज्यातील शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले असून त्यांना ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आले आहे.मात्र आता हे चिन्हच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.याचे कारण म्हणजे शीख समाजातर्फे या चिन्हांबाबत आक्षेप घेण्यात आला असून सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रणजीत सिंह कामठेकर यांनी याप्रकरणी निवडणूक आयोगाला निवेदन पाठवले आहे.ढाल तलवार हे चिन्ह खालसा समाजाच्या धार्मिक प्रतिकाशी मिळते जुळते असल्याने त्याचा निवडणूकीचे चिन्ह म्हणून वापर होऊ नये अशी मागणी कामठेकर यांनी केली आहे.यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाला निवेदन पाठवले असून जर याबाबत निर्णय झाला नाही तर रणजीत सिंह न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे शिंदे गटाची अडचण होऊ शकते.यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळालेल्या मशाल या चिन्हावर सुद्धा समता पक्षाने दावा केला आहे.
दरम्यान शिंदे गटाने निवडणूक आयोगाला ढाल-तलवार,उगवता सूर्य आणि पिंपळाचे झाड अशा ३ चिन्हांचा पर्याय दिला होता.त्यातील ढाल तलवार हे चिन्ह आयोगाकडून त्यांना देण्यात आले.तर त्यांनी आपल्या पक्षाच्या नावासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे,बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची अशी ३ नावे दिली होती त्यातील बाळासाहेबांची शिवसेना हे नाव त्यांना मिळाले आहे.