झारखंड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० नोव्हेंबर २४ बुधवार
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील ३८ जागांवर मतदान प्रक्रिया सुरू झाली असून या टप्प्यात एकूण ५२८ उमेदवार रिंगणात आहेत. मतदान केंद्रांवर सकाळी ७ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार आहे याशिवाय उर्वरित मतदान केंद्रांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.सर्व बुथवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून १ कोटी २३ लाख ५८ हजार १९५ लोक मतदान करणार आहेत.संथाल परगाणाच्या १८ जागांवर,उत्तर छोटानागपूरच्या १८ जागांवर आणि दक्षिण छोटानागपूरच्या २ जागांवर मतदान होणार आहे.
सत्ताधारी जेएमएम काँग्रेस युतीची भाजपा आणि त्याचा स्थानिक ऑल झारखंड स्टुडंट्स यूनियन पार्टी यांच्याविरोधात सामना आहे.मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे बऱ्हेतमध्ये भाजपाच्या गमालीएल हेम्ब्रोम यांच्याशी तर त्यांची पत्नी कल्पना सोरेन या गांडेमध्ये भाजपाच्या मुनिया देवी यांच्याशी लढत होणार आहे.भाजपाचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी धनवार जागेवर सीपीआय एलचे राजकुमार यादव यांच्याकडून निवडणूक लढवणार आहेत.याशिवाय राजकीय दिग्गज शिबू सोरेन यांची सून सीता सोरेन यांचा जामतारा येथे काँग्रेसच्या इरफान अन्सारी यांच्याशी सामना होणार आहे.पहिल्या टप्प्यात माओवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्काराचे आवाहन केले होते परंतु, नक्षलग्रस्त पश्चिम सिंघभूम जिल्ह्यात मतदारांनी हे आवाहन धुडकावत मतदान केले.नक्षलवाद्यांनी मतदानात अडथळे आणण्याचे प्रयत्न केले मात्र सुरक्षादलांनी ते हाणून पाडले.सरकारी योजनेच्या लाभार्थींच्या खात्यात मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे जमा झाल्याची तक्रार भाजपने निवडणूक आयोगाकडे केली.‘झारखंड मुख्यमंत्री मैयन सन्मान योजनेच्या’निधीबाबत चौकशी करावी अशी मागणी भाजपने केली.हा निधी दर महिन्याला सहा किंवा सात तारखेला जमा होतो मग यंदा मतदानापूर्वीच कसा जमा केला ? असा सवाल भाजपच्या नेत्यांनी केला आहे.