राज्यातील ९९० संवेदनशील (क्रिटिकल) मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अधिक बंदोबस्त ठेवण्यात आला असून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ५०० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.राज्यातील एक लाख ४२७ मतदान केंद्रांपैकी ६७,५५७ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे एक लाखाहून अधिक समजाकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती त्यानुसार राज्यभरात प्राप्त अर्जांपैकी ८६ हजार ४६२ अर्ज मंजूर करण्यात आले असून त्यांना गृह मतदानांची सुविधा देण्यात आली.दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.लोकसभा निवडणुकीत मुंबईत मतदानाच्या दिवशी प्रचंड गोंधळ झाला होता.मतदान केंद्रांवर भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.मतदानासाठी मतदारांना बराच वेळ ताटकळत राहावे लागले होते यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती.या पार्श्वभूमीवर राज्यात लोकसभेच्या तुलनेत सुमारे दोन हजार मतदान केंदांची संख्या वाढविण्यात आली आहे तसेच मतदान केंद्राबाहेर मतदारांना ताटकळत बसावे लागू नये म्हणून एका वेळी एकापेक्षा अधिक मतदारांना मतदान केंद्रात सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.मतदान केंद्रात मोबाइल फोन नेता येणार नाही असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.या आदेशाचा शहरी भागांमध्ये काही प्रमाणात फटका बसू शकतो अशी भीती निवडणूक आयोगाला आहे.मोबाइल न्यायचा नसेल तर मतदानाला का जावे असा विचार करणारा एक वर्ग आहे.