बीड-पोलीस नायक (वृत्तसेवा)  :-

दि.२० नोव्हेंबर २४ बुधवार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे.दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात ३२ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.मतदाना मुळे राज्यभर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.मात्र सरकारला व पोलिसांना अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यात यश मिळालेले नाही. नाशिकमधील विद्यमान आमदार सुहास कांदे व अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्यातील हमरीतुमरीपाठोपाठ परळीमधून (बीड) एक संतापजनक घटना समोर आली आहे.समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.हा व्हिडीओ परळीतील एका मतदान केंद्राबाहेरचा असल्याचा दावा केला जात आहे.या व्हिडीओत काही लोकांची टोळी एका तरुणाला मारहाण करत असल्याचे पाहायला मिळत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने हा व्हिडीओ एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे.यासह दावा केला आहे की,मारहाण करणारे लोक भाजपाचे कार्यकर्ते व धनंजय मुंडेंचे समर्थक आहेत तसेच ज्या व्यक्तीला मारहाण होत आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील (शरद पवार) पदाधिकारी आहे.

राष्ट्रवादीने (शरद पवार) हा व्हायरल व्हिडीओ एक्सवर शेअर करत म्हटले आहे की लोकशाहीच्या उत्सवात ठोकशाहीने मतांची बेगमी करणाऱ्या धनंजय मुंडे गटाच्या गुंडांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेश सरचिटणीस माधव जाधव यांना मारहाण केली.ही घटना निंदनीय आहेच पण राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचे द्योतक सुद्धा आहे अशा घटनांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष जाहीर निषेध करतो.या व्हिडीओत दिसतंय एक माणूस झाडाखाली उभा आहे त्याचवेळी काही तरुणांची टोळी तिथे आली.त्यांनी धनंजय मुंडेंचा जयजयकार करत झाडाखाली उभ्या असलेल्या त्या व्यक्तीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

दरम्यान शरद पवारांच्या पक्षाचे खासदार,बीडचे लोकप्रतिनिधी बजरंग सोनावणे यांनी देखील या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केला आहे यासह सोनावणे यांनी म्हटले आहे की आमचे सहकारी ॲड.माधव जाधव यांना परळी मतदारसंघातील बुथ बाहेर विरोधी पक्षाच्या गुंडानी बेदम मारहाण केली अशा दहशत पसरवणाऱ्या वृत्तीचा जाहीर निषेध.परळी मतदारसंघात सुरु असलेल्या मतदान प्रक्रियेत छेडछाड केलेले अनेक व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत.