Just another WordPress site

समाजात फूट पाडणारी वक्तव्ये केल्याने मतांचे ध्रुवीकरण !! शरद पवार यांची टीका !!

कराड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२५ नोव्हेंबर २४ सोमवार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व भाजप नेत्यांनी प्रचारात ‘बटेंगे तो कटेंगे’ यांसारखी वक्तव्य केल्याने मतांचे ध्रुवीकरण झाले तसेच महायुती सत्तेतून गेल्यास ‘लाडकी बहीण योजना’ बंद होईल या प्रचाराची चिंता लागून महिलांनी उत्स्फूर्त मतदान केल्याने ‘महायुती’ला मोठे बहुमत मिळाल्याचे निरीक्षण खासदार शरद पवार यांनी कराडमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना नोंदवले.आमचा मोठा पराभव झाला म्हणून मतयंत्र (ईव्हीएम) व मतदान प्रक्रियेवर शंका उपस्थित करणे योग्य नसून त्याबाबतची माहिती घेऊनच बोलणे उचित ठरेल असे मत पवारांनी व्यक्त केले.विधानसभेच्या निकालात आमचा मोठा पराभव झाल्यानंतर एखादा घरात बसला असता परंतु मी घरी बसणाऱ्यातील नसून पुन्हा जनतेत जाणार आहे असे शरद पवारांनी सांगितले.विधानसभेचा निकाल अपेक्षित नसून यासह मतयंत्रासंदर्भात सहकाऱ्यांचे मत मी ऐकले परंतु मतयंत्रावर संशय करण्याइतपत आपल्याकडे अधिकृत माहिती नसल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नसल्याचे पवार म्हणाले.लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील जनतेने जी भूमिका घेतली त्यामुळे आमचा विश्वास दुणावला होता असे सांगताना महाविकास आघाडीत समन्वय नव्हता वगैरे म्हणणे चुकीचे असून अशा कशाचाही निकालावर परिणाम झाल्याचे आपल्याला वाटत नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

आपले वय झाल्याने आपण थांबावे असे बोलले जात असल्याकडे लक्ष वेधले असता मी काय करावे हे मी आणि माझे सहकारी ठरवतील असे पवार म्हणाले.मी बारामतीत घरातील उमेदवार दिला नसता तर सर्वत्र वेगळा संदेश गेला असता तसेच अनुभवी उमेदवार आणि नवा उमेदवार लढतीच्या निकालाची आम्हाला कल्पना होती.अजित पवार व युगेंद्र पवार अशी तुलना होऊ शकत नाही आणि अजित पवार यांना मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या हे मान्य करावे लागेल असे शरद पवारांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची हा निकाल न्यायालयात असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मान्यता आपल्याकडे असल्याचे ते म्हणाले.राज्य सरकारकडून काय अपेक्षा राहतील यासंदर्भात ते म्हणाले,त्यांनी सरकार बनवून कामाला सुरुवात तरी करू देत असे स्पष्ट करून भाजपचे संख्याबळ पाहता त्यांच्याकडेच राज्याचे नेतृत्व राहील,भाजप म्हणेल तेच मित्रपक्षांना ऐकावे लागेल असे पवार यांनी सांगितले.विरोधीपक्ष नेतेपद मिळण्याइतपत आपल्या पक्षाचे संख्याबळ नसल्याचे त्यांनी कबूल केले. संसदेचे अधिवेशन झाल्यानंतर पुन्हा राज्यात जोमाने कामाला लागणार असल्याचे शरद पवार यांनी नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.