मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२६ नोव्हेंबर २४ मंगळवार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून महायुतीला २३९ जागा मिळाल्या आहेत.अत्यंत प्रचंड आणि घवघवीत यश महायुतीला मिळाले आहे.मागच्या तीन दशकात एकाही युती किंवा आघाडीला असे यश मिळवता आले नव्हते.२३ नोव्हेंबरच्या या निकालावर विरोधकांनी काही प्रमाणात संशय व्यक्त केला आहे मात्र आता महायुतीसमोरचा पुढचा पेच आहे मुख्यमंत्री कोण ? याचा.दरम्यान आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे कारण २६ नोव्हेंबर ही तारीख महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेची शेवटची तारीख आहे.
मुख्यमंत्री कोण होणार यावरुन भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेत पेच
महायुतीत भाजपाला सर्वाधिक १३२ जागा मिळाल्या आहेत.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाला सलग तिसऱ्यांदा १०० पार जागांचे यश मिळाले असून त्यांच्या नावे हा रेकॉर्डच तयार झाला आहे.तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ५७ आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवारांच्या ४ अशा ६१ जागा मिळाल्या आहेत.अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री या पदावर दावा सांगितलेला नाही.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आमची काही हरकत नाही असे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने म्हटले आहे तर संघानेही देवेंद्र फडणवीस यांच्या नावालाच अनुमोदन दर्शवले आहे.दुसरीकडे शिवसेनेची मागणी वेगळी आहे. महाराष्ट्रात महायुतीला जे यश मिळाले ती विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढवण्यात आली होती त्यामुळे महायुतीने आता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावे अशी मागणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून होते आहे.महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवला जावा अशी मागणी शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी केली आहे त्यामुळे आता महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाचे काय होणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा आज एकनाथ शिंदे देण्याची शक्यता आहे कारण आज महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत संपते आहे.राजीनामा दिल्यानंतर ते त्यांची मागणी काय आहे हे सांगू शकतात किंवा देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पाठिंबा जाहीर करण्याचा मोठा निर्णयही घेण्याची शक्यता आहे त्यामुळे आज महाराष्ट्रात नेमक्या काय घडामोडी घडणार याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे.दिल्लीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले आहेत तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद असेल असेही कळत आहे.नेमके काय होणार हे अद्याप समजू शकलेले नाही. एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर १४ वी विधानसभा बरखास्त होईल.१५ वी विधानसभा स्थापन होईल आणि राज्यपाल महायुतीला नेता निवडण्याबाबत सूचना देतील तसेच सरकार स्थापनेसाठी आमंत्रण देतील.या सगळ्या घडामोडी घडेपर्यंत जो कालावधी जाईल त्या कालावधीत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील.