राज्यघटनेच्या संस्कृत अनुवादाचा प्रकल्प म्हैसूर येथील केंद्रीय भाषा संस्थेच्या (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस) ‘राष्ट्रीय अनुवाद अभियान’ने हाती घेतला होता त्यामध्ये आकाशवाणी आणि दूरदर्शनचे माजी संस्कृत कार्यक्रम प्रमुख डॉ.बलदेवानंद सागर तसेच पुण्यातील डेक्कन कॉलेजचे डॉ.भव शर्मा आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे श्रीनंद बापट यांच्यासह दहा जणांनी योगदान दिले.म्हैसूर येथे गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांमध्ये हे काम करण्यात आले होते त्यानंतर पुण्यात आल्यावर पुढच्या काही महिन्यांमध्ये सर्व मजकुराची तपासणी करून फेब्रुवारी अखेरीस हे काम पूर्णत्वास गेले.हे सर्व काम सुरू असताना संसद आणि विधिमंडळांमध्ये महिला आरक्षण लागू करण्यासंदर्भात घटनादुरुस्ती झाली तिचाही संस्कृत अनुवाद यामध्ये समाविष्ट करून अद्ययावत करण्यात आले आहे अशी माहिती श्रीनंद बापट यांनी दिली.देशाने राज्यघटना स्वीकारल्यानंतर १९५० च्या दशकातच राज्यघटनेच्या संस्कृत अनुवादाची पहिली आवृत्ती प्रकाशित झालेली होती.भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील विद्वान महामहोपाध्याय पां.वा.काणे हे त्या समितीचे अध्यक्ष होते.संस्कृत अनुवादाची दुसरी आवृत्ती १९८५ मध्ये प्रकाशित झाली.त्या आवृत्तीच्या कामाचे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे प्रमुख होते.१९८५ सालानंतर गेल्या ३९ वर्षांत राज्यघटनेत झालेल्या दुरुस्त्यांसह आता नवीन आवृत्ती संस्कृतमध्ये पुन्हा प्रकाशित झाली आहे.राज्यघटनेच्या संस्कृत अनुवाद प्रकल्पामध्ये काम करण्याची मिळालेली संधी ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.यानिमित्ताने कोश प्रकल्पाइतकेच महत्त्वाचे काम करता आले असे डॉ.भव शर्मा डेक्कन कॉलेज यांनी म्हटले आहे.