“भाजपात एकही महिला मुख्यमंत्री पदासाठी लायक नाही का”? !! महिला मुख्यमंत्री पदावरून सुषमा अंधारेंनी महायुतीला विचारले दोन प्रश्न !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० नोव्हेंबर २४ शनिवार
राज्यात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला असून महायुतीला निर्वावाद बहुमत मिळाले असले तरीही मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे.मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंनी माघार घेतली असली तरीही भाजपाकडून अद्यापही या पदाचा चेहरा समोर आलेला नाही.तर दुसरीकडे राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चाही रखडली आहे त्यामुळे राज्यात शपथविधी केव्हा होणार ? राज्यात नवे सरकार कधी स्थापन होणार ? याबाबत अनेक प्रश्नचिन्ह आहेत यातच शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी भाजपाला रोखठोक प्रश्न विचारला असून “विजयाची खात्री नसलेल्या शिंदे गटाच्या एका वाचाळ प्रवक्त्याने निकालाच्या पूर्वसंध्येला म्हटले होते की पुढच्या ४८ तासांत महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली नाही तर २६ नोव्हेंबरला राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार.शिंदे गटाचा सत्तेतील दावा तर संपला.सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री मात्र अजूनही ठरत नाही.आज असे कळतेय मुख्यमंत्री पदाचा शपथविधी ५ डिसेंबरला होईल यानिमित्ताने दोन प्रश्न निर्माण होतात” असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
भाजपात एकही महिला मुख्यमंत्री पदासाठी लायक नाही का?
“एक म्हणजे भारतीय जनता पार्टी ज्या लाडक्या बहीण योजनेचा प्रचंड गवगवा करतेय त्या लाडक्या बहिणींना सत्तेचा वाटा देणार की नाही ? लाडक्या बहिणीला १५०० रुपये आणि अख्खी तिजोरी लाडक्या भावांच्या हातात असे किती दिवस चालणार ? भाजपात एकही महिला मुख्यमंत्री पदाच्या योग्य नाही का ?” असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.तर “दुसरा प्रश्न जर ५ डिसेंबरला सरकारचा शपथविधी होणार असेल तर तर हे राज्य ५ तारखेपर्यंत कोणाच्या भरवश्यावर चालणार आहे ?” असेही त्यांनी विचारले आहे.दरम्यान मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले असले तरीही त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही तसेच मंत्रिमंडळाबाबत आज चर्चा होणार होती परंतु एकनाथ शिंदे साताऱ्यात त्यांच्या गावी गेल्याने आजची बैठक रद्द करण्यात आली आहे.