मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०२ डिसेंबर २४ सोमवार
राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठ दिवस झाले तरी अद्याप महायुतीने सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही.२८८ पैकी तब्बल २३५ जागा जिंकून महायुतीने न भूतो न भविष्यति अशा प्रकारची कामगिरी केली आहे मात्र महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा काही ठरलेला नाही त्यामुळे महायुतीवर विरोधक टीका करू लागले आहेत.अशातच महायुतीचे नेते देखील एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत.“महायुतीत अजित पवार आमच्या मध्ये (भाजपा व एकनाथ शिंदेंची शिवसेना) नसते तर आमच्या ९० ते १०० जागा निवडून आल्या असत्या” असा दावा शिवसेनेचे (शिंदे) नेते तथा माजी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.त्यावर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीने (अजित पवार) जशास तसे उत्तर दिले आहे.या पक्षाचे प्रवक्ते व विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी म्हणाले,“अजित पवार नसते तर शिंदे गटाच्या ९० ते १०० जागा आल्या असत्या हा गुलाबराव पाटलांचा गोड गैरसमज आहे त्यांनी महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये”.अजित पवार यांचे निकटवर्तीय व त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते म्हणाले,“महायुती म्हणून आपण सगळे एकत्र निवडणूक लढलेलो आहोत आणि आताही आपण एकत्र राहिले पाहिजे.शेवटी अजित पवार यांनी घेतलेली मेहनतही दुर्लक्षित करता येणार नाही.तिन्ही पक्षांनी निवडणुकीत खूप मेहनत केली आहे.आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मेहनत नाकारत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी केलेली मेहनत देखील नाकारत नाही कारण आम्हाला ठाऊक आहे की या तिन्ही नेत्यांनी,तिन्ही पक्षांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत.मोठ्या मेहनतीने आपल्याला या निवडणुकीत यश मिळाले आहे.चांगल्या पद्धतीने आपण सत्ता आणल्यावर अशा प्रकारे महायुतीत कोणीही मिठाचा खडा टाकू नये”.
अमोल मिटकरी म्हणाले,“शिवसेनेचे (शिंदे) नेते रामदास कदम असतील किंवा गुलाबराव पाटील असतील यांनी अजित पवारांना टार्गेट (लक्ष्य) करू नये.महायुतीत वितुष्ट निर्माण करू नये.गुलाबराव पाटलांनी एक गोष्ट समजून घ्यावी त्यांचे नाव गुलाबराव आहे त्यांनी त्याच्या नावासारखे राहावे.हल्ली त्यांचा सुगंध कमी झालेला दिसतोय.कॅबिनेटमध्ये म्हणजेच राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपदी त्यांची वर्णी लागतेय की नाही याबद्दल जरा शंका आहे त्यामुळे ते अशी वक्तव्ये करत असावेत.मला गुलाबरावांना एवढेच सांगायचे आहे की तुम्ही गुलाबरावांसारखे राहा,जुलाबराव होऊ नका अशी परखड प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे.