दरम्यान संजय राऊत म्हणाले,भारतातील निवडणुका जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या पक्षाने समाजांमध्ये ठिणगी टाकण्याचे काम केले असून त्याचे परिणाम जगभरातील हिंदूंवर होत आहेत.नेपाळ,कॅनडा,बांगलादेश व पाकिस्तान या देशांमध्ये हिंदूंना त्रास दिला जात आहे.बांगलादेशमध्ये हिंदूंची जीवितहानी चालू आहे व याला केवळ मोदींची धोरणे कारणीभूत आहेत.निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी भारतातील मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.मोदी यांनी व भाजपाने देशभरातील मुस्लिमांना टार्गेट केले.प्रार्थना स्थळांचे खोदकाम करायला प्रोत्साहन दिले व त्याचा उलटा परिणाम हिंदूंवर झाला.इतर देशातील हिंदूंना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत.इतर देशांमध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवण्याची मोदी सरकारमध्ये ताकद नाही.बांगलादेशमध्ये जाऊन तिथल्या हिंदूंवर होणारे अत्याचार, हल्ले थांबवण्याची ताकद मोदी किंवा भाजपाच्या सरकारमध्ये नाही असे संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला.बहुमत मिळाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी राज्यात सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत.विधानसभेचा निकाल लागून आज आठ दिवस होऊन गेले मात्र अद्यापही महायुतीचे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांवर बैठका सुरु आहेत.यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांची दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक देखील झाली.मात्र या बैठकीनंतरही अद्याप सरकार स्थापन होऊ शकलेले नाही त्यामुळे सरकार स्थापन का झाले नाही ? यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे मात्र गृहमंत्री पदावरून शिंदेंची शिवसेना आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरु असल्याचे बोलले जात आहे.या सर्व घडामोडींवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले असून “एका गृहमंत्री पदावरून हे सरकार अडलेले नाही तर यामागे वेगळी कारणे आहेत” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे तसेच महायुतीचे सरकार अद्याप का स्थापन होऊ शकले नाही ? याबाबत आता अनेकांनी तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली आहे.

“मला एक कळत नाही.भारतीय जनता पक्ष हा जगातला एक नंबरचा पक्ष आहे.त्यांच्या पक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा मजबूत नेता आहे.महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आहेत मग एका गृहमंत्री पदावरून या राज्याचे सरकार अधांतरी लटकून पडलेले आहे मग हे कसले मजबूत नेते ? तुमच्याकडे बहुमत आहे,तुमच्याकडे स्वत:चा बहुमताचा आकडा आहे.तुमच्याबरोबर ४० आमदार घेऊन अजित पवार आहेत.तुमच्याबरोबर शिंदे गटाचे लोक आहेत की नाही हे मला माहिती नाही.ते भविष्यात काय करतील माहिती नाही.बहुमत असतांना तुम्ही शपथ घेत नाहीत.राज्याला सरकार देत नाही.राजभवनामध्ये सरकार स्थापनेचा दावा करायला तयार नाहीत. त्यात तुमचे जे समर्थक आमदार आहेत त्यांचे नावे द्यायला तुम्ही तयार नाहीत.राज्यपालांकडून तुम्ही सरकार स्थापनेचे निमंत्रण घेतलेले नाही आणि तुम्ही मांडव घातला ? राजभवन तुम्ही चलवताय का ?” असे अनेक सवाल संजय राऊत यांनी महायुतीला केले आहेत.“हे सरकार एका गृहमंत्री पदावरून अडकलेले नाही.भाजपाने मनात आणले तर समोरचे जे मागण्या करत आहेत ना ? तर हे एका मिनिटात चिरडून टाकतील.हे सर्व डरपोक लोक आहेत,ईडी आणि सीबीआयला घाबरून पळून गेलेले लोक आहेत.ते स्वबळावर निवडून आलेले नाहीत.ते कसे निवडून आले ? हे लोकांना माहिती आहे आणि त्यांनाही माहिती आहे.त्यांना जनमताचा पाठिंबा नाही पण एका गृहमंत्री पदावरून हे सरकार अडलेले नाही तर यामागे काही वेगळी कारणे आहेत का ? फक्त एक गृहमंत्री पद हा सरकार स्थापनेचा वादाचा विषय असू शकत नाही.या सर्व गोष्टीचा उलगडा व्हायला हवा अन्यथा आम्ही आमचे बंद पुस्तक उघडू” असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.