“नरेंद्र मोदी यांना हे शिकवायला पाहिजे होते…” !! मोहन भागवतांच्या ‘त्या’ विधानावर औवेसींची प्रतिक्रिया !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०२ डिसेंबर २४ सोमवार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे त्यांच्या एका विधानामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत.भागवत यांनी एका कार्यक्रमात बोलतांना दोन किंवा तीन मुलांपेक्षा कमी मुले झाली तर समाजाचे अस्तित्व टिकणार नाही असे मत व्यक्त केले आहे.त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा होत असून यावर एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.औवेसींनी मोहन भागवातांच्या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली आहे.अधुनिक लोकसंख्या शास्त्र असे सांगते की लोकसंख्या वृद्धीदर २.१ पेक्षा कमी झाला की कोणते संकट आले नाही तर तो समाज नष्ट होतो.अनेक भाषा,समाज असे नष्ट झाले असल्याचे मोहन भागवत म्हणाले होते.
नागपूर येथील बी.आर.ए.मुंडले शाळेच्या सभागृहात रविवारी कठाळे कुलसंमेलन आयोजित करण्यात आले यावेळी बोलतांना मोहन भागवत म्हणाले की,“जणसंख्या कमी होतेय हा चिंतेचा विषय आहे कारण आधुनिक लोकसंख्या शास्त्र सांगते २.१ च्या खाली जायला लागलो तर तो समाजच नष्ट होतो.कोणी त्याला मारेल असे नाही तर त्याला काही संकट नसले तरी तो नष्ट होतो पुढे चालत नाही.अनेक भाषा व समाज असे नष्ट झाले त्यामुळे २.१ च्या खाली येता कामा नये.आपल्या देशाची जणसंख्या नीती जेव्हा ठरली त्याच्यातही २.१ च्या खाली नसावे असे सांगण्यात आले पण ०.१ तर माणूस जन्मत नाही म्हणजे २ पेक्षा जास्त पाहिजे किंवा कमीत कमी ३ पाहिजे असे शास्त्र सांगते” असे मोहन भागवत म्हणाले होते.भागवतांच्या या विधानानंतर असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली असून औवेसी म्हणाले की,“हे त्यांनी नरेंद्र मोदींना शिकवायची गरज आहे जे लोकसभा निवडणूकीत म्हणाले होते की मुस्लिम महिला जास्त मुले जन्माला घालतात.पंतप्रधान त्यांच्या भाषणात म्हणाले की,हिंदू महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून त्या महिलांना दिले जाईल ज्या जास्त मुले जन्माला घालतात.आता मोहन भागवत म्हणत आहेत की जास्त मुले जन्माला घाला.आरएसएसवाल्यांनी लग्न करायला सुरूवात केली पाहिजे.पहिल्यांदा तुम्ही आम्हाला शिव्या देता… झारखंडमध्ये म्हणाले की मुस्लिमांची लोकसंख्या वाढत आहे”असे टीका असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.