या मुलाखतीवेळी मुनगंटीवार यांना प्रश्न विचारण्यात आला की,निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महायुतीने आश्वासन दिले होते की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करू व महिलांना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देण्याचे आश्वासन तुम्ही दिले होते ते आश्वासन पूर्ण कराल का ? कारण राष्ट्रवादीने (अजित पवार) म्हटले आहे की हे केवळ एकनाथ शिंदे यांचे आश्वासन होते.यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले,“आम्ही १०० टक्के ते आश्वासन पूर्ण करू.महिलांना दिली जाणारी रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये अशी वाढवली नाही तर देशभरात आमची प्रतिमा खराब होईल.निवडणुका जिंकल्यानंतर आश्वासन पूर्ण न करणारे अशी आमची प्रतिमा देशभर पसरवली जाईल.मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की आपण आपल्या शब्दांवर ठाम राहायला हवे.महायुतीचा जाहीरनामा समितीचा अध्यक्ष या नात्याने मी आमच्या जाहीरनाम्यातून संकल्प पत्रातून दिलेली आश्वासने धुळीस मिळू देणार नाही.आमच्या सरकारमध्ये प्रत्येक पात्र महिलेला २१०० रुपये देण्याची क्षमता आहे. मला वाटत नाही की आमचा कोणताही मित्रपक्ष याला विरोध करेल.वाढीव रक्कम कधीपासून दिली जाणार ? जानेवारी की जुलै,कोणत्या महिन्यापासून ही वाढीव रक्कम द्यायची यावर चर्चा केली जाईल.आम्ही गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना लागू केली होती त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.