मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०३ डिसेंबर २४ मंगळवार
भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे येथे भेट घेतली व या बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,मी ३० वर्षांपासून शिंदे यांच्याबरोबर काम करत आहे.माझे आणि त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत.मी त्यांची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो.आम्ही जुन्या गोष्टींना उजाळा दिला मात्र या शिंदेंची भेट घेतल्यानंतर गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी गेले त्यामुळे या भेटीमागे राजकारण असल्याची चर्चा सुरू झाली.मात्र शिवसेनेचे प्रवक्ते,आमदार संजय शिरसाट यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे तसेच गिरीश महाजन हे संकटमोचक वैगरे नसल्याचे ते म्हणाले.संजय शिरसाट माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले, “त्या दोन नेत्यांमध्ये काय चर्चा झाली ? याची मला कल्पना नाही पण गृहखात्यावर किंवा इतर कोणत्याही खात्यावर गिरीश महाजन यांची चर्चा झालेली नाही तसेच गिरीश महाजन यांना ते अधिकार सुद्ध नाहीत जर खात्यांबाबत चर्चा झालीच तर ती देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात होईल.गिरीश महाजन हे फक्त प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गेले होते तसेच प्रकृती बरी झाल्यानंतर तातडीने बैठक घेतल्या तर जागावाटपाचा तिढा सुटेल अशी त्यांची विनंती होती म्हणून संकटमोचक गेले आणि काही तिढा सुटला असा काही प्रकार इथे झालेला नाही.”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी सकाळी ज्युपिटर रुग्णालयात काही वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी गेले होते यानिमित्ताने संजय शिरसाट माध्यमांशी बोलत असतांना त्यांना एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबत प्रश्न विचारण्यात आला.जर शिंदेंची प्रकृती ठीक नसेल तर ते ५ डिसेंबरच्या शपथविधीला हजर राहणार का ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावर शिरसाट म्हणाले की,शपथविधीला ते हजर राहणार की नाही ? याबाबत डॉक्टरच ठरवू शकतात.त्यांची मनस्थिती कशी आहे याबाबत डॉक्टरच सांगू शकतील पण आमची सर्वांची इच्छा आहे की एकनाथ शिंदे यांनी शपथविधीला हजर राहावे.
दरम्यान ज्युपिटर रुग्णालयात चाचण्या पूर्ण झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुंबईतील वर्षा निवासस्थानी पोहोचले आहेत इथे ते शिवसेना आमदारांची बैठक घेणार आहेत.