मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.०४ डिसेंबर २४ बुधवार

विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला असून या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला बहुमत मिळाले आहे तर विरोधकांच्या महाविकास आघाडीला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे.६४ वर्षांच्या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात कोणत्याही पक्षाला मिळाले नाही इतक्या मोठ्या प्रमाणात मताधिक्य महायुतीला मिळाले आहे.हा निकाल पाहून राज्यभरातून निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त होऊ लागला आहे.विरोधकांनी देखील ईव्हीएमला विरोध केला आहे.दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावच्या ग्रामस्थांनी देखील निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे.माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडीचे ग्रामस्थ केवळ निवडणुकीच्या निकालावर आक्षेप घेऊन स्वस्थ बसले नाहीत तर त्यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करत गावात मतपत्रिकेद्वारे फेरमतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी ३ डिसेंबर रोजी मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची योजना आखली होती मात्र प्रशासनाने त्यांना असे करण्यापासून रोखले मात्र गावकरी त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले परिणामी प्रशासनाने मारकडवाडीत संचारबंदी लागू केली आहे.काहीही झाले तरी मतपत्रिकेवर मतदान घेणार अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतल्यामुळे प्रशासनाने गावात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार म्हणाले,“४०० उंबऱ्यांच्या गावात ३०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत”.प्रशासन या मतदानाला इतका विरोध का करत आहे असा प्रश्न देखील सामान्य जनतेतून व विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख जितेंद्र आव्हाड म्हणाले,“सरकार का घाबरले ? एका गावाने एक मताने मतपत्रिकेवर गावातल्या गावातच मतदान घेण्याचे ठरवले त्यामुळे हे सरकार इतके घाबरले की त्यांनी गावात १४४ कलम लागू करून मतदान करूच द्यायचे नाही असा निर्णय घेतला.महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी या गावात लोकशाहीवरील आपला विश्वास कायम ठेवण्यासाठी म्हणून ईव्हीएमद्वारे झालेले मतदान आणि मतपत्रिकेवरील मतदान याची तुलना करण्यासाठी गावाने बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय घेतला.लोकांचे म्हणणे आहे की ईव्हीएमवर आमचा विश्वास नाही म्हणून आम्ही बॅलेट पेपरवर मतदान करून आम्ही आमच्या पद्धतीने सत्यता शोधून काढू पण सरकारने या गावात १४४ कलम लावून हे मतदान होण्यापासून रोखले.सरकार या मतदानाला एवढे का घाबरले? एका गावात तुम्ही रोखले पण आता लाट येईल अन प्रत्येक गावागावात हे सुरू होईल,तुम्ही कुठे कुठे रोखणार ? ठिणगी पडली आहे आता वणवा पेटेल.! असे जितेंद्र आव्हाड यांनी नमूद केले आहे.