महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ५ डिसेंबरला शपथ घेत आहेत.२३ तारखेला मतमोजणी झाली त्यानंतर १० ते १२ दिवसांनी महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळतो आहे.खऱ्या अर्थाने हे महाराष्ट्राचे दुर्दैव असून एवढे प्रचंड बहुमत मिळूनही महाराष्ट्रात मुख्यमंत्री ठरला नव्हता.सुमारे १३ दिवस महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळू शकला नाही यामागचे कारण काय ? हे भाजपा आणि गद्दार गटाने स्पष्ट करणे गरजेचे आहे.दोन दिवसांपासून लाडक्या बहिणींची वाताहत लावण्याचे काम सुरु झाले आहे.महाराष्ट्रात शेतकरी हाल सहन करतो आहे.या प्रश्नांच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे आमचे लक्ष आहे असे विनायक राऊत  यांनी म्हटले आहे.“एकनाथ शिंदेंच्या निर्णयाला आता काडीची किंमत राहिलेली नाही.गरज असेल तर या नाहीतर चालते व्हा असे सांगायची ताकद भाजपाने ठेवली आहे.५ डिसेंबरला जो शपथविधी होतो आहे त्यासंबंधीच्या निर्णयात एकनाथ शिंदे सहभागी नाहीत तसेच त्यांच्या विचारांना कुठलीही किंमत देण्यात आलेली नाही.तु्म्हाला गरज असेल तर आमच्या मंत्रिमंडळात या नाहीतर अजित पवार आहेत बरोबर.अजित पवार आणि छगन भुजबळांनी शिंदे गटाची विकेट कधीच काढली आहे.” असेही विनायक राऊत  म्हणाले. एकनाथ शिंदेंची गरज आता संपली आहे.शिवसेना फोडण्याचे पाप भाजपाने शिंदेंच्या माध्यमातून केली आहे तरीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार निवडून आले आहेत.महाराष्ट्राची फसवणूक जशा प्रकारे करण्यात आली आहे ती पुरे झाली.आता महाराष्ट्राचे प्रश्न सोडवा किंवा ते सोडवण्यासाठी तुम्ही काय करणार ते सांगा असेही विनायक राऊत म्हणाले.वारेमाप पैशांचा वापर निवडणुकीत केला गेला तसेच ईव्हीएमचा घोटाळा १०० टक्के झाला आहे व हा मेरिटवर मिळालेला विजय नाही असेही विनायक राऊत यांनी म्हटले आहे.