मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.०५ डिसेंबर २४ गुरुवार

देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत व याआधी दोन वेळा त्यांनी हे पद भूषवले आहे व त्यातील पहिली टर्म त्यांनी पूर्ण केली असून दुसऱ्यावेळी मात्र अवघ्या ७२ तासांसाठी ते पदावर होते त्यामुळे सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपदी असणारे नेते ही नोंदही त्यांच्यानावे झाली आहे.पण यंदा भरभक्कम बहुमताच्या जोरावर पूर्ण कार्यकाळ पदावर राहण्यासाठी फडणवीस सज्ज झाले आहेत. Fadnavis 3.0 अर्थात देवेंद्र फडणवीसांची ही तिसरी टर्म कशी असेल ? याबाबत आता चर्चा सुरू झालेली असतांनाच त्यांनी एका मुलाखतीमध्ये त्याबाबत सूचक भाष्य केले आहे.यंदाच्या निवडणुकीत विरोधकांना जनतेने साफ नाकारल्याचे चित्र निर्माण झाले असून २८८ पैकी अवघ्या ४९ जागांवर महाविकास आघाडी अडकली.उलट महायुतीच्या पारड्यात जनतेने तब्बल २३५ जागांचे भरभरून दान दिले आहे व त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार यावर शिक्कामोर्तब झाले.एकीकडे लोकसभा निवडणुकीतील कौल विधानसभेला उलट कसा झाला ? यावर महाविकास आघाडीमध्ये विचारमंथन चालू असतांना दुसरीकडे महायुतीमध्ये कुणाला किती आणि कुठली मंत्रीपदे मिळणार यावर बैठका होत आहेत.पण फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद निश्चित झाल्यानंतर त्यांनी विरोधकांबाबत केलेले सूचक विधान सध्या चर्चेत आले आहे.