‘तीनही पक्षांच्या निमंत्रण पत्रिकेवर एकनाथ शिंदेंचे नावच नाही’ !! उपमुख्यमंत्रीपदाबाबत उदय सामंत यांचा इशारा !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०५ डिसेंबर २४ गुरुवार
विधानसभेचा निकाल लागल्यानंतर तब्बल ११ दिवसांनी महायुती सरकारचा शपथविधी होत आहे.मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी होईल असे जाहीर करण्यात आले आहे.आझाद मैदान येथे आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी तीनही पक्षांनी वेगवेगळ्या निमंत्रण पत्रिका छापल्या असून त्यावर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव छापलेले नाही त्यावरून आता विविध चर्चांना तोंड फुटले आहे.एकनाथ शिंदे हे शपथ घेणार की नाही ? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.या विषयावर आता उदय सामंत यांनी आपली भूमिका जाहीर केली असून एकनाथ शिंदे हेच उपमुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा असल्याचे ते म्हणाले तसेच या विषयाकडे राजकारण म्हणून न पाहता हा विषय आमच्यासाठी भावनिक असल्याचेही ते म्हणाले.
एकनाथ शिंदेंना डावलून कुणी काही करणार असेल तर…
शिवसेनेचे (शिंदे) नेते उदय सामंत म्हणाले,“एकनाथ शिंदे यांनी जर उपमुख्यमंत्री पद स्वीकारले नाही आणि त्यांनी ते शिवसेनेच्या इतर नेत्याला दिले तरी आम्ही ते स्वीकारणार नाही अशी आमची ठाम भूमिका आहे.शिवसेनेकडून कुणाचीही नावे आता माध्यमात येऊ नयेत अशी आमची अपेक्षा आहे.आमच्या कुणाच्याही मनात या खुर्चीवर बसण्याचा विचार नाही हा खुलासा करणेही आमच्यासाठी दुर्दैव आहे.एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आहेत.आमच्या सर्वांचे राजकीय भवितव्य त्यांच्या हातात दिले आहे व त्यांना डावलून कुणी काही करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही.”
निमंत्रण पत्रिकेवर एकनाथ शिंदेंचे नाव का नाही?
निमंत्रण पत्रिकेवर नाव नसल्याबाबत उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली असून ते म्हणाले,“प्रत्येक पक्षाने आपापल्या निमंत्रण पत्रिका छापून त्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना द्याव्यात व त्याची नोंद पोलीस स्थानकात ठेवावी असा निर्णय महायुतीच्या बैठकीत झाला होता.राष्ट्रवादी काँग्रेसने जी पत्रिका छापली त्यात अजित पवार यांचे नाव टाकलेले आहे तर शिवसेनेने (शिंदे) शासनाच्या निमंत्रण पत्रिकेचा फॉरमॅट घेतला आहे त्यामुळे यात काही ठरवून झाले आहे असे आम्हाला वाटत नाही.”शपथविधी काही तासांवर आला तरी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाबाबत थेट भूमिका जाहीर का करत नाहीत ? असाही प्रश्न उदय सामंत यांना विचारण्यात आला होता त्यावर ते म्हणाले,“पक्षात काय निर्णय घ्यावा हे आम्ही सर्व एकत्र बसून घेतो.एकनाथ शिंदेच उपमुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा आहे. प्रत्येक गोष्टीत राजकीयदृष्टया पाहण्यापेक्षा काही गोष्टीत भावनिकदृष्ट्याही पाहिले गेले पाहीजे.एकनाथ शिंदे आमचे नेते आहेतच. पण आमचा पक्ष कुटुंबासारखा आहे. एकनाथ शिंदे जर मंत्रिमंडळात राहणार नसतील तर आमचा तिथे राहून काय उपयोग ? अशी आमची भावना आहे पण तरीही ते आमचा आग्रह ऐकतील असा आमचा विश्वास आहे.”शिवसैनिकांचा आग्रह म्हणून आज सायंकाळी ५.३० वाजता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असे उदय सामंत यांनी ठामपणे सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला !!
“आज साडेपाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे.आम्ही शिवसेनेच्या वतीने सर्वच आमदारांनी एकनाथ शिंदेंना विनंती केली होती की कोणत्याही स्थितीत त्यांनी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हायला हवे.शिवसेना आमदार,शिवसैनिक,महायुतीचे आमदार व देवेंद्र फडणवीसांनी स्वत: केलेली विनंती याला मान देऊन एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद घ्यायचे मान्य केले.आम्ही त्यानंतर देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर आलो होतो व त्यांच्याकडून एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शिफारसीचे पत्र आम्हाला त्यांनी दिले व ते आम्ही आता राजभवनावर येऊन प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्याकडे सुपूर्द केले आहे” असे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे आमदार उदय सामंत यांनी माध्यमांना सांगितले आहे.
“कोंडी नव्हतीच”, उदय सामंत यांनी मांडली भूमिका
“या प्रक्रियेत कोंडी अजिबात नव्हती.देवेंद्र फडणवीस असो किंवा आम्ही माजी मंत्री असोत,शिवसेनेचे पदाधिकारी-खासदार असोत आम्हा सगळ्यांची इच्छा होती की एकनाथ शिंदेंनी सरकारमध्ये असणे आमच्या दृष्टीने आवश्यक होते.आम्ही सगळ्यांनी एकनाथ शिंदेंना तशी विनंती केली होती.एकनाथ शिंदेंनी संघटन प्रमुख म्हणून, पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रभर फिरून पक्षाचे काम करायचे आणि इतर कुणालातरी संधी द्यायची हा विचार केला होता पण हे आम्हाला मान्य नाही असे आम्ही त्यांना सांगितले.ते उपमुख्यमंत्री व्हायला हवेत ही प्रत्येक शिवसैनिकाची इच्छा होती.ती आज एकनाथ शिंदेंनी पूर्ण केली त्याबद्दल आम्ही सगळे त्यांचे आभारी आहोत” असेही उदय सामंत म्हणाले.
महत्त्वाच्या खात्यांवरून मतभेद ? उदय सामंत म्हणतात…
“यात काहीही तथ्य नाही.एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांशीही स्पष्टपणे बोलू शकतात.नरेंद्र मोदी,अमित शाह यांच्याशी स्पष्टपणे ते बोलू शकतात.खातेवाटप किंवा मंत्रीपदावर तिन्ही नेते एकत्र बसून योग्य प्रकारे सोडवतील.त्यात वेगळे चित्र निर्माण करण्याची कुणाचीही इच्छा नाही हेदेखील स्वत: एकनाथ शिंदेंनी सांगितले आहे” अशा शब्दांत उदय सामंत यांनी मतभेदांवर स्पष्टीकरण दिले आहे.