“राज ठाकरे भाजपाच्या हातातले खेळणे..”!! देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचे टीकास्त्र !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०७ डिसेंबर २४ शनिवार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत असून नुकतीच त्यांनी सह्याद्री वाहिनीला मुलाखत दिली व त्यात त्यांना राज ठाकरेंबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.राज ठाकरेंनी लोकसभेला महायुतीला पाठिंबा दिला होता मात्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना महायुतीत घेण्यात आले नाही यापुढे राज ठाकरेंना बरोबर घेतले जाईल का ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.या प्रश्नावर उत्तर देतांना देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यात स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेला बरबोर घेण्याचा प्रयत्न करू असे म्हटले होते.यावर आता संजय राऊत यांनी खोचक टीका केली असून राज ठाकरे हे भाजपाच्या हातातील खेळणे झाले आहेत असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले,राज ठाकरेंना भाजपाकडून खेळवले जात असून राज ठाकरे त्यांच्या हातातील खेळणे झाले आहे हे स्पष्ट दिसत आहे.काल देवेंद्र फडणवीस यांच्या विधानातून हे स्पष्ट झाले आहे की,भाजपा सांगेल त्या पद्धतीने भूमिका घेत आहेत.त्यांच्याविषयी आम्हाला आता काही बोलायचे नाही.लोकसभेत,विधानसभेत आता महानगरपालिकेत मनसेने काय करायचे हे देवेंद्र फडणवीस ठरवत आहेत.एका बाजूला महाराष्ट्रामध्ये,मुंबईत मराठीत न बोलता गुजराती,मारवाडीत बोला असा भाजपाचा आग्रह आहे.मराठी लोकांवर दबाव आहे.त्या भाजपाचे नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंनी काय भूमिका घ्यावी,राज ठाकरेंनी कुणाबरोबर जावे हे पत्ते पिसत बसले असतील तर त्याबाबत राज ठाकरेंनी भूमिका व्यक्त केली पाहीजे.”आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी,मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शेवटपर्यंत लढत राहू असेही संजय राऊत यांनी नमूद केले आहे.