शिक्षकांचा फोटो वर्गात लावणे बंधनकारक – राज्य सरकारचा निर्णय
सरकारच्या या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये नाराजी
मुंबई – पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राज्य सरकारने ‘आपली गुरुजी ‘मोहिमेअंतर्गत संबंधित शिक्षकांचा फोटो त्या त्या वर्गामध्ये सन्मानपूर्वक प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले आहे.या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून दोन आठवड्यात याबाबत पूर्तता करावी अशा सूचना मा.सचिव शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्य यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.
राज्य सरकारने ‘आपले गुरुजी’ मोहिमेसाठी परिपत्रक काढून शिक्षकांचा फोटो वर्गात लावणे बंधनकारक केले असल्याने सरकारच्या या निर्णयामुळे शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.शिक्षकांवर अविश्वास दाखविणे अयोग्य असल्याचे शिक्षक संघटनांनी म्हटले आहे.परिणामी सदरील परिपत्रक मागे घेतले नाही तर याबाबत आंदोलन करण्याचा इशाराही शिक्षक संघटनांनी दिला आहे.’आपले गुरुजी’ या नावाने राज्य सरकारने परिपत्रक जारी केले असून या परिपत्रकानुसार शिक्षकांना स्वतःचा फोटो त्या त्या वर्गामध्ये लावण्याचे निर्देश देण्यात आले आहे.मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार येत्या दोन आठवड्यात याबाबत पूर्तता करण्याची सूचना देण्यात आली आहे.
तर दुसरीकडे या परिपत्रकाबाबत शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.सरकार शिक्षकांना वर्गामध्ये फोटो लावण्यास सांगून शिक्षकांबाबत अविश्वास दाखवत आहेत का? राज्य सरकारचा शिक्षकांवर विश्वास नाही का?असा सवाल शिक्षक संघटनांनी केला असून या परिपत्रकाचा निषेध केला आहे.सरकारने जारी केलेल्या या परिपत्रकास विरोध करत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष उदय शिंदे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिले आहे.राज्य सरकार सन्मानाच्या नावाखाली शिक्षकांचा अवमान करीत आहे.असा उल्लेख उदय शिंदे यांनी या पत्रामध्ये केला आहे व हे परिपत्रक मागे घेतले नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.