महायुतीमधील तीन पक्षांच्या एकमेकांविरोधात फाईल बाहेर येण्यास सुरुवात !! अधिवेशनात स्फोट होणार !! संजय राऊत यांचे सूतोवाच
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१४ डिसेंबर २४ शनिवार
निकाल लागून २० दिवस झाले आहेत.ईव्हीएमच्या माध्यमातून पाशवी बहुमत ओरबडल्यानंतरही या लोकांना सरकार स्थापन करता आलेले नाही.मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.राज्यात सरकार नसल्यामुळे रोज खून-दरोडे आणि लुटमार सुरू आहे.मुख्यमंत्र्यांची नागपूरमध्ये मिरवणूक निघणार असल्याचे समजले म्हणजे राजा उत्सवात मग्न आहे.राज्याला गृहमंत्री,आरोग्य मंत्री शिक्षण मंत्री नाही…हे कसले राज्य आहे ? तीनही पक्षांमध्ये ताळमेळ नाही त्यामुळे आम्हाला या राज्याची चिंता वाटते अशी टीका शिवसेनेचे (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.आज सकाळी माध्यमांशी बोलत असतांना संजय राऊत म्हणाले,“महायुतीने कुणालाही मंत्री केले तरी तीन पक्षाचे लोकच एकमेकांच्या विरोधात फाईल आणून देणार आहेत.तशा फाईल यायला सुरुवात झालेली आहे.या तीन तंगड्या एकमेकांत अडकून महाराष्ट्राचे नुकसान होणार आहे.विधानपरिषेदतील आमचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे महत्त्वाच्या विषयांना वाचा फोडतीलच तसेच शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेही नागपूर अधिवेशनासाठी जात आहेत त्यामुळे याच अधिवेशन काळात एखादा स्फोट होऊ शकतो असे खात्रीने सांगतो.”
भाजपाच्या डोक्यात सडके कांदे-बटाटे !!
दादरच्या हनुमान मंदिराच्या विषयावरून शिवसेना-भाजपामध्ये वाद सुरू झाला आहे.काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून हा विषय समोर आणला व त्यानंतर भाजपाकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.या टीकेला उत्तर देताना संजय राऊत आज म्हणाले,भाजपाच्या डोक्यात सडके कांदे-बटाटे भरलेले आहेत का ? हिंदुत्त्वाचा सातबारा भाजपाच्या नावावर कुणी केला.भाजपाला हिंदुत्त्वाची ओळख शिवसेनेने करून दिली.हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी भाजपाचे बोट धरून त्यांना हिंदुत्त्वाच्या वाटेवर नेले व त्याही वाटेवर आता या लोकांनी खड्डे खणून ठेवले आहेत.आमचे हिंदुत्व मतांसाठी नसून ते आमचे जीवन आहे.आज सायंकाळी दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत महाआरती होणार आहे अशीही माहिती संजय राऊत यांनी दिली.जर भाजपाचे हिंदुत्व जागृत असेल तर त्यांनीही या आरतीसाठी तिथे यावे असेही ते म्हणाले.