नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१६ डिसेंबर २४ सोमवार
विधानसभा निवडणूक निकालानंतर तीन आठवड्यांनी राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार रविवारी (१५ डिसेंबर) झाला.देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात विविध जाती-जमातीची समीकरण साधतांना तिन्ही पक्षांनी ज्येष्ठ नेत्यांना धक्का दिला.यात छगन भुजबळ,दिलीप वळसे-पाटील,सुधीर मुनगंटीवार यांच्यासह काही ज्येष्ठ मंत्र्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला असून ३९ जणांपैकी २० नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली.नागपूरमधील राजभवनाच्या प्रांगणात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला.राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचा आधीच शपथविधी झाला होता.हे तीन व नवे ३९ असे एकत्रित मंत्रिमंडळाचे आकारमान ४२ इतके झाले आहे.कायद्यानुसार ४३ मंत्रिपदांची तरतूद असल्याने एक मंत्रिपद रिक्त ठेवण्यात आले आहे व हे मंत्रिपद कोणासाठी रिक्त ठेवण्यात आले याची नंतर कुजबुज सुरू झाली.
फडणवीसांच्या मंत्रिमंडळात मराठा,ओबीसी,आदिवासी,धनगर,अनुसूचित जाती,अल्पसंख्याक,बिगर मराठी अशा सर्व जाती-जमातींचा समतोल राखण्यात आला आहे. याशिवाय विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र,कोकण,उत्तर महाराष्ट्र असा विभागीय समतोल राखण्यात आला आहे.भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील,गिरीश महाजन,मंगलप्रभात लोढा,चंद्रशेखर बावनकुळे,अॅड.आशीष शेलार,गणेश नाईक,राधाकृष्ण विखे-पाटील,पंकजा मुंडे,अतुल सावे,शिवसेनेचे उदय सामंत,दादा भुसे,शंभूराज देसाई तर राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे,नरहरी झिरवळ,आदिती तटकरे,अनिल पाटील आदींना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
- नव्या मंत्रिमंडळात एकूण चार महिला मंत्री आहेत यामध्ये पंकजा मुंडे,माधुरी मिसाळ,आदिती तटकरे,मेघना बोर्डीकर यांचा समावेश आहे.
- रविवारी ३३ कॅबिनेट मंत्र्यांचा व सहा राज्यमंत्र्यांचा शपथिधी झाला.
- फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एकूण ४२ मंत्री आहेत.
- मंत्रिमंडळात भाजपाने नऊ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
- शिवसेनेने सहा तर राष्ट्रवादी काँग्रेसने पाच नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
- फडणवीसांच्या मंत्रिमंडळात भाजपाचे १७ कॅबिनेट मंत्री व तीन राज्यमंत्री आहेत.
- शिवसेनेचे १० कॅबिनेट व दोन राज्यमंत्री आहेत.
- राष्ट्रवादीचे आठ कॅबिनेट व एक राज्यमंत्री आहेत.
- सातारा जिल्ह्याला सर्वाधिक मंत्रीपदे मिळाली आहेत.साताऱ्यात चार कॅबिनेट मंत्री आहेत.शंभूराज देसाई (पाटण),शिवेंद्रराजे भोसले (सातारा),जयकुमार गोरे (माण) व मकरंद पाटील (वाई) यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे.
- पुणे जिल्ह्याला तीन कॅबिनेट व एक राज्यमंत्रीपद मिळाले आहे.
- नाशिक व जळगाव जिल्ह्याला तीन कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली आहेत.
- नाशकात दादा भुसे,माणिकराव कोकाटे व नरहरी झिरवाळ यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे.
- जळगावात गुलाबराव पाटील,गिरीश महाजन व संजय सावकारे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे.
- रत्नागिरी जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत तर एक राज्यमंत्री मिळाले आहेत.उदय सामंत व नितेश राणे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे तर योगेश कदम यांना राज्यमंत्रीपद मिळाले आहे.
- रायगड जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत यामध्ये आदिती तटकरे व भरत गोगावले यांचा समावेश आहे.
- कोल्हापूर जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत यामध्ये हसन मुश्रीफ व प्रकाश आबिटकर यांचा समावेश आहे.
- ठाणे जिल्ह्याला दोन मंत्री लाभले आहेत यामध्ये एकनाथ शिंदे व प्रताप सरनाक यांचा समावेश आहे.
- मुंबईला मंगलप्रभात लोढा व आशिष शेलार यांच्या रुपाने दोन कॅबिनेट मंत्री लाभले आहेत.
- राज्यातील १९ जिल्ह्यांना किमान एक तरी मंत्री लाभला आहे.
- १७ जिल्ह्यांना एकही मंत्रीपद मिळालेले नाही.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितला फॉर्म्युला
काय म्हणाले एकनाथ शिंदे ?
“आम्ही पक्षात ठरवले आहे की अडीच वर्षांचं मंत्रिपद असेल त्यामुळे अनेक लोकांना संधी देऊ शकतो.जो काम करेल त्याला संधी मिळेल.जो विभाग ज्याला मिळेल तिथे त्याने पूर्ण काम करून दाखवले पाहिजे.जो परफॉर्म करेल त्याला संधी मिळेल” अस एकनाथ शिंदे यांनी सांगितले.यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्रकारांनी भाजपाचा देखील अडीच वर्षांचे मंत्रिपद असेल असा फॉर्म्युला ठरला आहे का ? असा सवाल केला.यावर आम्ही प्रत्येक मंत्र्यांच्या कामाचे परफॉर्मन्स ऑडिट करू असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.एकनाथ शिंदे म्हणाले,अनेक नेते असे आहेत,त्यांच्यात मंत्री होण्याची क्षमता आहे.आम्ही अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरवल्याने अनेक चेहऱ्यांना संधी मिळेल मात्र त्यातही परफॉर्मन्स दाखवावा लागेल.परफॉर्म ऑर पेरिश असाच फॉर्म्युला एक प्रकारे एकनाथ शिंदे यांनी सांगितला आहे तसेच आता आमच्यापुढे मिशन समृद्ध महाराष्ट्र हेच मिशन आहे.महाविकास आघाडीच्या काळात जे बंद पडलेले प्रकल्प होते त्यांना आम्ही मागच्या अडीच वर्षांत चालना दिली.आताही आम्ही महाराष्ट्र समृद्ध कसा होईल याकडे आमचे संपूर्ण लक्ष असणार आहे असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.
भाजपातही असाच फॉर्म्युला असेल असेल का ? हे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले आम्ही परफॉर्मन्स ऑडिट करु.ऑडिटमध्ये लक्षात आले की मंत्री योग्य काम करत नाही आहे तेव्हा त्या मंत्र्यांचा पुनर्विचार केला जाईल असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.कॅबिनेटच्या बैठकीत आम्ही तिघांनी आपल्या मंत्र्यांना सांगितले आहे की परफॉर्मन्स ऑडिट केले जाईल व ज्यांना मंत्री म्हणून घेतले नाही त्यांना पक्षाकडून वेगळी जबाबदारी दिली जाईल.भाजपमध्ये ज्यांना मंत्री केले जात नाही तेव्हा त्यांना पक्षाकडून काही वेगळी जबाबदारी देण्याचे निर्णय झालेले असतात मात्र जे मंत्री आज ड्रॉप झाले आहे त्याच्यामध्ये काही लोक परफॉर्मन्स न केल्यामुळे ड्रॉप झाले असतील असेही होऊ शकते असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
सातारा-पुणे तुपाशी तर अर्धा विदर्भ उपाशी !! राज्यातील १७ जिल्हे मंत्रिपदापासून वंचित !!
नव्या मंत्र्यांचा शपथविधी व त्यानंतरची कॅबिनेट बैठक आटोपल्यानंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले,आम्ही वेगवेगळ्या समाजांना,जिल्ह्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिले आहे.आमचे मंत्रिमंडळ हे सर्वसमावेशक असे आहे.फडणवीसांनी त्यांचे मंत्रिमंडळ सर्वसमावेशक असल्याचे वक्तव्य केले असले तरी त्यांच्या मंत्रिमंडळात अनेक जिल्ह्यांची पाटी कोरीच असल्याचे पाहायला मिळत आहे.फडणवीसांच्या मंत्रिमंडळात राज्यातील १९ जिल्ह्यांमधील किमान एका तरी आमदारांना मंत्रिपद मिळाले आहे तर १७ जिल्ह्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्त्व मिळालेले नाही.एकट्या सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली आहेत तर विदर्भातील अर्ध्याहून अधिक जिल्ह्यांचा मंत्रिमंडळात प्रतिनिधी नाही.
अहिल्यानगर,कोल्हापूर,पुणे,जळगाव,ठाणे,नाशिक,यवतमाळ,बीड,मुंबई शहर,मुंबई उपनगर,रत्नागिरी,धुळे,छत्रपती संभाजीनगर,सातारा,रायगड,सिंधुदुर्ग, बुलढाणा,लातूर,नागपूर.
हे १७ जिल्हे मंत्रिपदापासून वंचित !!
नंदुरबार,अकोला,वाशिम,अमरावती,वर्धा,भंडारा,गोंदिया,गडचिरोली,चंद्रपूर,नांदेड,हिंगोली,परभणी,जालना,पालघर,उस्मानाबाद,सोलापूर,सांगली.
लाडकी बहीण मंत्रिमंडळात मात्र दोडकी! केवळ चारच महिलांना मंत्रिपदं; फडणवीस म्हणाले, “संख्या ३०० टक्क्यांनी वाढली”