बैलांसकट गडी घेऊन गेले – सदाभाऊ खोत

मित्रपक्षांना तिन्ही पक्षांनी सामावून घेणे गरजेचे होते.तीन पक्षांनी मित्रपक्षांसाठी काही मंत्रिपदे बाजूला काढून ठेवायला हवी होती परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही.गाव गाड्यामध्ये पैरा केला जातो त्याप्रमाणे दुर्दैवाने काही झाले की आम्ही तीन पक्षांचे शेत नांगरुन दिले मात्र आमचे शेत नांगरायची वेळ आली तेव्हा बैलासकट गडी घेऊन गेले.आम्ही मात्र शेतात उभे आहोत मात्र प्रामाणिकपणे महायुतीसोबत उभे आहोत असे सदाभाऊ खोत म्हणाले.एबीपी माझाशी सदाभाऊ खोत यांनी संवाद साधला तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केले आहे.२४० लोक आपले निवडून आले आहेत,मंत्रिपदे देण्याला काही मर्यादा होत्या,कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात,कालांतराने ही सगळी मंडळी कामात येतील.शेतकरी एखाद्या वर्षी शेत पिकल नाही म्हणून पेरणी करायचे थांबत नाही.दुसऱ्या वर्षी पेरणी होतीय का हे बघत राहायचे असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले. सदाभाऊ खोत हे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कृषी राज्यमंत्री होते.काही महिन्यांपूर्वी त्यांना भाजपनं विधानपरिषदेवर संधी दिली होती मात्र यावेळी मंत्री होता न आल्याने त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

रवी राणाही नाराज असल्याचे समोर

युवा स्वाभिमान पक्षाचे बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा देखील नाराज असल्याचे समोर आले आहे.ते अधिवेशन सोडून अमरावतीला परतल्याची माहिती आहे.दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत देखील मंत्रिपद न मिळाल्याने खदखद पाहायला मिळाली.नरेंद्र भोंडेकर यांनी वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देईन असे म्हटले आहे.प्रकाश सुर्वे यांची नाराजी देखील लपून राहिली नाही.तानाजी सावंत देखील नाराज असल्याच्या चर्चा होत्या मात्र त्यांच्या कार्यालयाने तानाजी सावंत आरोग्याच्या कारणामुळे नागपूरहून निघाल्याचे म्हटले आहे.दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारात अनेक मातब्बरांना संधी मिळाली नसल्यामुळे नाराजांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.