मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२१ डिसेंबर २४ शनिवार

राज्यात गेल्या महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडली व यामध्ये महायुतीने प्रचंड मोठा विजय मिळवला.विधानसभेच्या निकालानंतर राज्यभरात ईव्हीएमबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.निकालानंतर माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान घेण्याचा प्रयत्न केला होता पण प्रशासनाने या मतदानाला परवानगी नाकारली होती.त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मारकडवाडी येथे जाऊन गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते.आता ग्रामस्थांचे म्हणणे ऐकण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार अदित्य ठाकरे ५ जानेवारीला तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल १० जानेवारीला मारकडवाडीला जाणार आहेत.याबाबतची माहिती माळशिरसचे राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार उत्तम जानकर यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे,राहुल गांधी,केजरीवाल मारकडवाडीत

माळसिरस विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार उत्तम जानकर यांनी उद्धव ठाकरे,राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्या मारकडवाडीच्या भेटीबाबात माहिती दिली आहे.साम टीव्हीशी बोलताना आमदार उत्तम जानकर म्हणाले,“उद्धव ठाकरे आणि अदित्य ठाकरे पाच जानेवारीला मारकडवाडीला येणार आहेत तर १० तारखेला राहुल गांधी,प्रियांका गांधी आणि अरविंद केजरीवाल यांचे मारकडवाडीला येणाचे नियोजन सुरू आहे.हे लोक इथे गावाने बंड का केले हे जाणून घेण्यासाठी आणि इथे काय झाले हे पाहण्यासाठी येणार आहेत.”

मारकडवाडीची देशभरात चर्चा

ईव्हीएम मतदान प्रणालीवर सार्वत्र शंका उपस्थित केली जात असताना माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदानासाठी पाऊल उचलले होते त्यानंतर संपूर्ण देशात मारकडवाडीची चर्चा होत आहे.या पार्श्वभूमीवर मारकडवाडीत ज्येष्ठ नेते शरद पवार ग्रामस्थांशी संवाद साधत ईव्हीएम प्रणाली विरुद्ध एल्गार पुकारला होता त्यानंतर भाजपाचे आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीनाथ पडळकर यांनी ईव्हीएम प्रणालीच्या बाजूने सभा घेतली होती.यानंतर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी,वायनाडच्या काँग्रेस खासदार प्रियांका गांधी आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही मारकडवाडीला येत ग्रामस्थांची भेट घेणार आहेत. ठाकरे,गांधी आणि केजरीवाल यांच्या मारकडवाडी भेटीमुळे राज्यासह देशभरता येत्या काळात ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा गाजणार आहे.