सोन्याच्या हव्यासापायी सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून !! मृतदेहाचे तुकडे करून शौचालयाच्या शोष खड्ड्यात पुरले !!
कृष्णा नारायण चामे (वय ५२) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून पोलिसांनी संशयित आरोपी शेतमजुराला अटक केली आहे.दरम्यान मृत कृष्णा चामे हे बेपत्ता झाल्याबाबत त्यांच्या घरच्या मंडळींनी मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.पोलिसांच्या तपासात कृष्णा चामे यांच्या ठाव ठिकाणाबाबत कोणतीही माहिती मिळत नव्हती.तपासात मृत चामे यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करीत असलेल्या सचिन भागवत गिरी याने दिलेल्या माहितीनुसार कृष्णा चामे यांना एका अज्ञात व्यक्तीने दुचाकी वर बसवून नेल्याचे समोर आले.त्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून मोहोळ पोलिसांनी कृष्णा चामे यांच्या बेपत्ता ऐवजी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्याबाबतही कोणतेही धागेदोरे सापडत नव्हते.सालगडी सचिन गिरी याची पुन्हा विश्वासात घेऊन चौकशी केली असता विसंगत माहिती मिळू लागल्याने पोलिसांनी सालगड्यावर प्रश्नांची सरबत्ती केली असता शेवटी या गुन्ह्याची उकल झाली व त्याने हा गुन्हा स्वतः केल्याची कबुली दिली.
दरम्यान कृष्णा चामे हे अंगावर १८-१९ तोळे सोन्याचे दागिने वापरत होते व हेच सोन्याचे दागिने परस्पर लाटण्याचा सालगडी सचिन गिरी यास मोह झाला व त्यामुळेच त्याने कृष्णा चामे यांच्या डोक्यात सुरुवातीला हातोड्याने प्रहार करून त्यांचा खून केला तसेच नंतर धारदार शस्त्राने शरीराचे तुकडे-तुकडे करून ते वेगवेगळ्या पॉली कॅप कॅरीबॅग मध्ये भरले आणि घरासमोरील शौचालयाच्या शोष खड्ड्यामध्ये पुरून ठेवले.मृत कृष्णा चामे यांच्या अंगावरील संपूर्ण सोन्याचे दागिने काढून घरासमोर खड्ड्यात पुरल्याची माहितीही उजेडात आली.पोलिसांनी अधिक तपास केला असता सालगडी सचिन गिरी याच्याविरुद्ध धाराशिव जिल्ह्यात यापूर्वी तीन जबरी चोरी विषयक गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली मात्र त्याच्यासोबत अन्य साथीदार आहेत किंवा कसे ? याचा उलगडा लगेचच झाला नाही त्यावर पुढील तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.