“मनसेने मते खाल्ल्यामुळे आमचे १० उमेदवार पडले” !! राज ठाकरेंच्या पक्षावर शिंदे गटाच्या मंत्र्याचा आरोप !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०८ जानेवारी २५ बुधवार
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारत आपली सत्ता कायम राखली आहे यामध्ये भाजपाने सर्वाधिक १३२,शिवसेना (एकनाथ शिंदे) ५७ आणि राष्ट्रवादीने (अजित पवार) ४१ अशा एकूण २३० जागांवर विजय मिळवला.अशात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मंत्री योगेश कदम यांनी विधानसभा निवडणुकीत मनसेने मते खाल्ल्यामुळे त्यांच्या पक्षाचे दहा उमेदवार पराभूत झाल्याचा दावा केला आहे.आता योगेश कदम यांच्या या दाव्यानंतर शिवसेना आणि मनसेमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.
मनसेमुळे आमचे १० उमेदवार पडले…
शिवसेना आणि मनसेबाबत बोलताना मंत्री योगेश कमद म्हणाले,“धनुष्यबाणावर निवडून आलेले ५७ आणि आम्हाला पाठिंबा असलेले ३ अपक्ष असे शिवसेनेचे ६० आमदार आज महाराष्ट्रात आहेत.विधानसभा निवडणुकीत आमचे जवळपास १० आमदार मनसेमुळे पडले आहेत.आपण जर गणित बघितले,आकडेवारी बघितली तर आमचे असे १० उमेदवार आहेत जे मनसेने जेवढी मते खाल्ली त्यापेक्षा कमी मतांनी पराभूत झाले आहे म्हणून मला वाटते याची पुनरावृत्ती होऊ नये.महायुती आणखी भक्कम करायची असेल,हिंदुत्त्व आणखी भक्कम करायचे असेल,मुंबईमध्ये मराठी माणसाला न्याय मिळवून द्यायचा असेल आणि मुंबईमध्ये पुन्हा महायुती निवडून येण्यासाठी राज ठाकरे यांनी सोबत येण्याचा निर्णय घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो.”