वर्धा येथील हिंदी विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या ताटात आढळल्या अळ्या:१३ विद्यार्थ्यांना विषबाधा
वर्धा-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
देश विदेशातून उच्च शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या स्वयंपाक घरातून जेवणाच्या ताटात अळ्यांची मेजवानी दिली जात असल्याचा प्रकार पुढे आला असून याप्रकरणी विद्यार्थ्यांनी निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यामुळे आंदोलन पुकारलेे आहे.महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात महात्मा गांधी यांच्या विचारांवर आणि अनेक शिक्षणाचे धडे दिले जातात.त्याच बरोबर विविध भाषांवर शिक्षण दिले जात आहे.उच्च शिक्षण घेण्यासाठी देश विदेशातील विद्यार्थी या विद्यापीठात प्रवेश घेत आहेत.त्यांना उत्तम दर्जाचा आहार मिळावा यासाठी स्वयंपाक घर तयार करण्यात आले असून त्या स्वयंपाक घरामधून विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याच्या अनेक तक्रारी वरिष्ठांना देण्यात आल्या होत्या तरीसुद्धा त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले.
शनिवारी रात्रीच्या वेळी अनेक विद्यार्थ्यांना जेवण दिले असता त्या जेवणाच्या ताटात अळ्या आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.या जेवणामधून १३ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असल्याची घटना घडली.यामध्ये पाच मुली व आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.अनेकदा तक्रारी करूनसुद्धा उत्तम दर्जाचे जेवण मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेत रात्री ९ वाजेपासून ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत आंदोलन सुरू केले होते.यात २०० विद्यार्थी सहभागी झाल्याने विद्यापीठातील वरिष्ठांनी तत्काळ लक्ष केंद्रित करून दखल घेतली आणि उत्तम दर्जाचे जेवण दिले जाणार असल्याचे आश्वासन दिले.त्यानंतर आंदोलन मध्यरात्री मागे घेण्यात आले.पैसे घेऊनदेखील योग्य भोजन मिळत नाही व रात्रीच्या जेवणात अळ्या निघाल्या.यात तब्बल १३ विद्यार्थ्यांना उलट्या झाल्या व प्रकृती अस्वस्थ झाल्याने संतापलेल्या विद्यार्थ्यांनी “भारत माता की जय”च्या घोषणा देत आंदोलनाचा पवित्रा घेतला.वरिष्ठांनी दखल घेतल्याने सदरील आंदोलन मागे घेण्यात आले आहे.