नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१६ जानेवारी २५ गुरुवार
नागपूरमध्ये एका ४७ वर्षांच्या मानसोपचार तज्ज्ञाला पोलिसांनी अटक केली असून हा मानसोपचार तज्ज्ञ त्याच्या विद्यार्थिनींना व माजी विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करत होता तसेच त्याने अनेक विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.तीन माजी विद्यार्थिनींनी मानसोपचार तज्ज्ञाच्या विरोधात तक्रार नोंदवल्यानंतर नागपूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.आपल्या पदाचा गैरवापर करुन या मानसोपचार तज्ज्ञाने अनेक विद्यार्थिनींचे शोषण केले असावे असा संशय पोलिसांना आहे त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा तो पैलूही तपासून पाहात आहेत.
नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,या मानसोपचार तज्ज्ञाने त्याच्या तीन माजी विद्यार्थिनींना काही आक्षेपार्ह फोटो पाठवले व त्यानंतर तो या तिघींना ब्लॅकमेल करु लागला.यातील एका विद्यार्थिनीने पोलिसात जाण्याचे धाडस दाखवले ज्यानंतर इतर दोघीही पुढे आल्या आणि त्यांनीही तक्रार नोंदवली.ज्यामुळे पोलीस मानसोपचार तज्ज्ञाला अटक करु शकले.या प्रकरणाबाबत पोलीस उपायुक्तांनी सांगितले की,आत्तापर्यंत आम्ही तीन जबाब नोंदवले आहेत.त्यांनी त्यांच्यावर कसा अन्याय झाला ते सांगितले आहे.प्रकरण संवेदनशील असल्याने या प्रकरणाच्या तपासासाठी आम्ही विशेष तपास पथक अर्थात SIT स्थापन केली आहे.आम्ही या प्रकरणातले सगळे पैलू तपासून पाहतो आहोत.इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.पोलिसांनी हे देखील सांगितले की सदर मानसोपचार तज्ज्ञाचे नागपूर शहरात क्लिनिक आहे व या क्लिनिकमध्ये हा मानसोपचार तज्ज्ञ त्याच्या विद्यार्थिनींना बोलवून घेत असे समुपदेशन कसे केले जाते हे सांगत असे,कधी त्यांचे समुपदेशन करत असे आणि त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करत असे.
गोंदिया आणि भंडारा येथील ग्रामीण भागातील शिबीरात सहभागी होण्यासाठी विद्यार्थिनी आणि पालकांना आमिष दाखवत असल्याचीही माहिती समोर आली आहे. पोलिसांनी हे देखील सांगितले या शिबीरातही त्याने काही विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केले अशीही माहिती समोर आली आहे.एका २७ वर्षीय विद्यार्थिनीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीत असेही सांगण्यात आले की सदर मानसोपचार तज्ज्ञाचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे.त्यात पोलिसांना अनेक महिलांचे अश्लील व्हिडीओ आणि छायाचित्र सापडली आहे.या प्रकरणी मानसोपचार तज्ज्ञाच्या एका मित्रावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात आणखीही काही मुली,माजी विद्यार्थिनी अडकलेल्या असू शकतात मात्र बदनामीच्या भीतीने त्या समोर आलेल्या नाहीत असा अंदाज आहे असेही पोलिसांनी सांगितले आहे.