मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री दिल्लीच्या हातातील बाहुल्या !!

“दिल्लीने मुख्यमंत्र्यांच्या निर्णयात हस्तक्षेप केला आहे हे सरकार दिल्लीतून चालेल असे आम्ही आधीपासून सांगत आलो आहोत.देवेंद्र फडणवीस,अजित पवार,एकनाथ शिंदे या कळसुत्री बाहुल्या आहेत आणि त्यांच्या हाता-पायांना बांधलेले दोरे दिल्लीतून नाचवले जातात हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे.मुख्यमंत्री सरकारचा निर्णय घेऊन राज्यातील गुंडागर्दी,मनमानी मोडण्याचा प्रयत्न करत असतांना दिल्ली रस्त्यावर येऊन पालकमंत्रीपदासाठी दंगल करणाऱ्यांच्या बाजूने उभी आहे.पालकमंत्री पदासाठी दंगल महाराष्ट्राने याआधी पाहिली नव्हती” अशीही टीका संजय राऊत यांनी केली आहे.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी २०१९ साली पहाटे झालेला शपथविधी हे एक षडयंत्र असल्याचे म्हटले होते तसेच धनंजय मुंडे यांनीही त्यावेळी अजित पवारांना थांबविण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले यावर संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की,त्यावेळच्या शपथविधीमध्ये जवळपास सर्वच सामील होते पण तो गुन्हा फसला व आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही.मुंडे म्हणत आहेत की,त्यावेळी अजित पवारांना थांबिवण्याचा प्रयत्न केला मग आता का नाही त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करत काकांच्या पाठीत खंजीर खुपवत असतांना तुम्ही त्यांना थांबवायला हवे होते असे संजय राऊत म्हणाले.

माजी खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाचे आमदार शिंदेंच्या शिवसेनेत येणार असल्याचे विधान केले होते त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की,राहुल शेवाळेंचा आम्ही दारूण पराभव केला.आता ते किती फोडाफोडी करणार ? अमित शाह आहेत तोपर्यंत शिंदे गटाचे अस्तित्व आहे त्यानंतर या लोकांना भविष्य नाही. अमित शाह आहेत म्हणून निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय तुम्हाला हवा तसा निकाल देत आहे बाकी तुमच्याकडे काय आहे ? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.