Just another WordPress site

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट जाहीर-शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या सेवेतील अधिकारी,कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना दिवाळी गिफ्ट जाहीर केले आहे.यंदाची दिवाळी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस येणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबरच्या वेतनाबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे यासंबंधीचा शासन निर्णय राज्य सरकारकडून प्रसिद्ध झाला आहे.राज्य सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी म्हणजेच २१ ऑक्टोबरपर्यंत वेतन अदा करण्याचे आदेश देणारा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.दिवाळी सणाची सुरुवात यावर्षी २२ ऑक्टोबर २२ पासून होत आहे.राज्य शासकीय अधिकारी,कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक यांना दिवाळी सण साजरा करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये या उद्देशाने ऑक्टोबर २०२२ चे माहे नोव्हेंबर २०२२ मध्ये देय होणारे वेतन,निवृत्तीवेतन दिवाळी सणापूर्वी देण्याचा सरकारचा विचार होता.राज्य सरकारने वेतन अदा करण्यासंदर्भातील नियम शिथील करुन ऑक्टोबर २०२२ या महिन्याचे वेतन आणि निवृत्तीवेतन २१ ऑक्टोबर २०२२ रोजी अदा करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हा परिषद,मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था,कृषी विद्यापीठे,अकृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी,कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक यांना देखील याचा लाभ होणार आहे.यासंबधीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देखील संबधित यंत्रणा आणि विभागांना देण्यात आले आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या सेवेतील पाच लाख कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी १२५०० रुपयांचा बिनव्याजी अग्रीम उचलण्यास मंजुरी दिली होती २०१८ नंतर हा निर्णय घेण्यात आला होता. १२५०० रुपये दहा हप्त्यांमध्ये परत जमा करण्याची मुभा कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती.आता त्यानंतर दिवाळीपूर्वीच ऑक्टोबर महिन्यात वेतन जमा करण्याचा निर्णय घेत राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.