जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
ऐन दिवाळीत एकीकडे सोयाबीन तेलाची मागणी प्रचंड वाढलेली असताना भावात तब्बल दहा ते बारा रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शेंगदाणा,सूर्यफूल आदी खाद्यतेलेही काही प्रमाणात महागल्याने राज्यभरातील गोरगरिबांसह सर्वसामान्य ग्राहकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.यंदा सोयाबीन पिकाला पावसामुळे मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याने उत्पादन कमी आले आहे.त्यामुळे सहाजिकच सोयाबीनची उत्पादने महागली आहेत.त्यात मागणी वाढल्याने सोयाबीनसह पामतेलाची आयात करावी लागत आहे.त्यामुळे तेलाच्या भावात मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे.प्रामुख्याने पंधरा दिवसांपूर्वी मिळणाऱ्या सोयाबीनच्या तेलामध्ये आज किलोमागे तब्ब्ल दहा ते बारा रुपये वाढले आहे.सप्टेंबर अखेरीस सोयाबीनची स्थिती चांगली होती.त्यामुळे सोयाबीन तेलाच्या किमतीही १२३ ते १२५ रुपये किलो या दराने स्थिर होत्या.मात्र सोयाबीनचे उत्पादन घटल्यामुळे तेलाच्या किमती वाढल्या.दिवाळीमध्ये गोरगरीब वर्ग व सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसला आहे.खाद्यतेलामध्ये सोयाबीनशिवाय,शेंगदाणा,सूर्यफूल,राईस ब्रँड आदी विविध कंपन्याचे तेल बाजारात विकले जाते.उत्तर महाराष्ट्रात विशेषत: धुळे,नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात सोयाबीन तेल मोठ्या प्रमाणात विकले जाते.धुळ्यामध्ये सोयाबीन तेलाचे मोठ्या उत्पादन होते.सध्या सोयाबीन तेलाच्या किमती १३४ ते १४० रुपये किलोमागे आहेत.शेंगदाणा तेल रुपये ३ ते ४ रुपये किलोमागे वाढले आहेत तसेच सूर्यफूल,राईस ब्रँड तेलाच्याही किमती ३ ते ५ रुपये किलोमागे वाढल्या आहेत.
याबाबत खाद्यतेलाचे घाऊक व्यापारी त्यांच्याशी संपर्क साधला असता सध्या सणासुदीचे दिवस असल्याने दिवाळीमुळे मागणी किमान २५ टक्क्यांनी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे पामतेलासह सोयाबीन तेलाचीदेखील आयात करावी लागत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे एकूणच या सर्वाचा परिणाम दरवाढीवर झाला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.