काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जेष्ठ नेते व गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासू मल्लिकार्जुन खर्गे विजयी
नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जेष्ठ नेते आणि गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे मल्लिकार्जुन खर्गे यांनी विजय मिळवला आहे.तब्बल २४ वर्षानंतर खर्गे यांच्या रूपाने काँग्रेसला बिगर गांधी घराण्यातील व्यक्ती अध्यक्ष म्हणून भेटला आहे.काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात लढत झाली.या निवडणुकीसाठी १७ ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया पार पडली होती.सोनिया गांधी,राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही मोठ्या उत्साहाने मतदान प्रक्रियेत भाग घेतला होता.या निवडणुकीत एकूण ९९०० पैकी ९५०० प्रतिनिधींनी मतदान केले होते.यामध्ये आज दि.१९ रोजी झालेल्या मतमोजणी दरम्यान मल्लिकार्जुन खर्गे यांनी तब्बल ७८९७ मतांनी विजय मिळवला तर शशी थरूर यांना फक्त १००० मते मिळाली.तर ४१६ मते बाद करण्यात आली.
२०१९ च्या लोकसभा निडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले होते.त्यानंतर सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून काम बघत होत्या.परंतु देशातील पक्षाची एकूण अवस्था पाहता काँग्रेसला कायमस्वरूपी अध्यक्षाची गरज होती.काही नेत्यांनी राहुल गांधी पुन्हा एकदा अध्यक्ष व्हावे अशी इच्छा व्यक्त केली मात्र राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्याने अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती.त्यामुळे तब्बल २४ वर्षांनी प्रथमच काँग्रेसला बिगर गांधी घराण्यातील व्यक्ती अध्यक्ष म्हणून लाभला आहे.