शाळा, महाविद्यालयांलगतच्या १०० मीटर परिसरातील तंबाखुजन्य उत्पादनांच्या विक्रीवर निर्बंध घालता यावे यादृष्टीने प्रत्येक पोलीस ठाण्यात एका विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे व या पथकाने शाळा परिसरात असलेल्या ३०० हून अधिक पान टपरी चालकांची तपासणी करून त्यांना समज दिली.यावेळी काही दुकानांमध्ये तंबाखूजन्य उत्पादने आढळली.संबंधित दुकानदारांना दुकानात तंबाखूजन्य उत्पादने विक्रीस ठेऊ नये अशी विनंती करण्यात आली मात्र विनंती केल्यानंतरही तंबाखुजन्य उत्पादनांची विक्री करणाऱ्या ५०९ जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली.तंबाखूजन्य उत्पादनांची विक्री करणाऱ्या ४५ जणांनी त्यांचे व्यवसाय बंद केले तर २४ दुकानदारांनी इतर व्यवसाय सुरू केला.

शाळेच्या आवारात जनजागृती फलक !!

‘परिमंडळ ७’अंर्तगत येणाऱ्या मुलुंड,नवघर,भांडुप,कांजूरमार्ग,विक्रोळी,पार्कसाईट,घाटकोपर आणि पंतनगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जानेवारी २०२५ पासून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.यामध्ये प्रत्येक शाळेच्या आवारात जनजागृती फलक देखील लावण्यात आले.या मोहिमेचा सकारात्मक परिणाम दिसत असून संपूर्ण मुंबईत आशा प्रकारची मोहीम राबण्याची मागणी सध्या नागरिकांकडून करण्यात येत आहे.तंबाखूजन्य उत्पादनांमुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे त्यामुळे आम्ही ही मोहीम हाती घेतली आहे.आगामी काळात ही मोहीम अशीच सुरू ठेवण्यात येणार असून सर्वसामान्य नागरिकांचा या मोहिमेला पाठींबा मिळत आहे असे विजय सागर,पोलीस उपायुक्त परिमंडळ ७ यांनी म्हटले आहे.