यावल आदिवासी विकास विभागातील विद्यार्थ्यांच्या परदेश दौऱ्यानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०३ एप्रिल २५ गुरुवार
येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या विविध आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांची इस्रो या परदेश (दौऱ्यासाठी) सहलीसाठी निवड करण्यात आली असून सदर सहलीकरिता निवड करण्यात आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नुकत्याच शुभेच्छा दिल्या आहेत.सोबत आदिवासी विद्यार्थ्यांचे कौतुक करून इस्रो सहलीचे विवरण व अनुभव पत्राद्वारे कळवावे अशी अपेक्षा जिल्हाधिकारी महोदय यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल अंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित अशा ५२ आश्रमशाळांचे तालुका व जिल्हा पातळीवर विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले व त्यात उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण वैज्ञानिक मॉडेल सादर करणाऱ्या १८ विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी निवड करण्यात आली आहे.या सहलीत विद्यार्थ्यांना इस्रो अहमदाबाद येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटरला भेट देण्याची संधी मिळणार आहे तसेच ते सायन्स सिटीला भेट देऊन तेथील एक्वेरियम,रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर वैज्ञानिक विभागांना प्रत्यक्ष भेट देऊन अनुभव घेणार आहेत.सदर निवड झालेले १८ विद्यार्थी व ६ शिक्षक इस्रो सहलीसाठी जातांना रेल्वेने व परतीचा प्रवास विमानाने करणार आहेत म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या प्रवासाचा अनुभव देखील घेता येणार आहे.सदरहू आदिवासी विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांची जिज्ञासा वाढावी आणि भविष्यात या क्षेत्रात त्यांना स्वतःला सिद्ध करता यावे हा या उपक्रमा मागचा मुख्य उद्देश आहे.या शैक्षणिक सहलींमुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकात वाचलेले ज्ञानच नव्हे तर प्रत्यक्ष अनुभव घेता येईल आणि भविष्यात देखील अशा प्रकारच्या उपक्रमांना चालना देण्यात येईल असा विश्वास जिल्ह्याचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी व्यक्त केला आहे.सदरील वैज्ञानिक सहलीचे नियोजन शिक्षण विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी पवन पाटील,आर.एम.लवणे,संदीप पाटील यांनी परिश्रमपूर्वक केले व त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आदिवासी विद्यार्थ्यांना ही अनमोल संधी मिळाली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.