कासवे येथे पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन फुटल्याने ग्रामस्थांवर दूषित पाणी पिण्याची वेळ !! ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका !!
सुरज सपकाळे,पोलीस नायक
पाडळसे ता.यावल (प्रतिनिधी) :-
दि.२८ एप्रिल २५ सोमवार
तालुक्यातील कासवे येथे पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईप लाईन गटारीखाली फुटल्याने गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.गटारीतील घाण पाणी थेट पाईप लाईनमध्ये मिसळत असल्याने पाण्याची गुणवत्ता पूर्णतः बिघडली असून त्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.या समस्येबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे तक्रारी करण्यात आल्या असून देखील संबंधित ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडून या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.तर दूषित पाणी प्यावे लागत असल्याने काही नागरिकांना उलट्या,जुलाब यांसारखे आरोग्यविषयक त्रास सुरू असून गावात साथीचे आजार पसरण्याची भीती गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान गटारीतून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे पाईप लाईनमधील पाणी दूषित होत असल्याने गॅस्ट्रो,डायरिया,टायफॉईड सारख्या आजारांचा मोठा धोका निर्माण झाला आहे व यामुळे गावातील लहान मुले,वृद्ध आणि गरोदर महिलांचे आरोग्य विशेषतः अधिक धोक्यात आले आहे.तरी ग्रामपंचायतीने तात्काळ पाईप लाईनची दुरुस्ती करून गावकऱ्यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी अशी जोरदार मागणी गावकऱ्यांनी केली आहे.याबाबत प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष न दिल्यास गावकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.याबाबत ग्रामपंचायतीकडून वारंवार आश्वासने दिली जात आहेत मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई केली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.