मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
मुंबई लोहमार्ग रेल्वे पोलिस हद्दीत एकाच दिवशी तब्बल दहा अपघाती मृत्यूंची नोंद झाली आहे याबाबतची माहिती नुकतीच समोर आली आहे.सदरील प्रवाशांचा मृत्यू हा धावत्या लोकलमधून पडून तसेच रेल्वेगाडीची ठोस लागून झालेले हे अपघात आहेत.या अपघातांमुळे मुंबई रेल्वेवरील प्रवासी सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मध्य-पश्चिम तसेच हार्बर रेल्वेवर प्रवासी सुरक्षिततेची जबाबदारी रेल्वे प्रशासन,रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिस यांच्यावर आहे.कुर्ला ते शीव दरम्यान लोकलमधून पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता.गर्दीमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक शक्यता रेल्वे पोलिसांनी वर्तवली आहे. शहाड ते कल्याण आणि आंबिवली ते टिटवाळा दरम्यान देखील एक प्रवासी धावत्या लोकलमधून पडला आहे.दरम्यान कुर्ला,ठाणे,कल्याण, मुंबई सेंट्रल,वांद्रे,बोरिवली,पालघर,वसई या स्थानकात असल्याच प्रकारच्या अपघाती मृत्यूची नोंद झालेली आहे.यात अज्ञात रेल्वेगाडीच्या धडकेत एकूण सात प्रवाशांचा अपघात झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे असे मुंबई लोहमार्ग पोलिसांनी स्पष्ट केले आहे.