वादळी वाऱ्यात नुकसान झालेल्या केळी पीक नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्यात यावे-नावरे येथील शेतकऱ्याची मागणी
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०३ जुलै २५ गुरुवार
मागील आठवड्यात वादळी वारा व पाऊसामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे केळी पिक जमीन दोस्त झाले असून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी आवश्यक तहसीलदार,तलाठी व सर्कल यांचेकडील पंचनामा संदर्भात प्रतिक्षेत असलेले नावरे येथील शेतकरी हिरामण पाटील हे हतबल झाल्याने त्यांनी न्याय मिळण्याची मागणी केली आहे.
यावल तालुक्यातील नावरे व परिसरात मागील आठवड्यात दि.२९ जुन रोजी संध्याकाळी ४ ते ५ वाजेच्या दरम्यान झालेल्या वारा व वादळी पाऊसात येथील शेतकरी हिरामण रमेश पाटील याचे शेत गट नं ५८ क्षेत्र २ हेक्टर बागाईत मध्ये जवळ जवळ ५ हजार केळी पीकाचे नुकसान होऊन जमीनदोस्त झाले होते.ऐन काढणीच्या वेळी आलेले पिक डोळ्यासमोर वादळी वारा व पाऊसामुळे जमीनदोस्त झाले त्यामुळे आज ४ दिवस उलटूनही कुणीही तलाठी किंवा सर्कल यांनी पाहणी दरम्यान पंचनामा केलेला नाही.चोपडा विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील हे पाऊसाळी अधिवेशनासाठी गेलेले असल्याने अधिकारी वर्गातुन दुर्लक्ष होत आहे.यापुर्वीच्या आपत्ती व व्यवस्थापन समितीच्या बैठकीत आमदार प्रा.चंद्रकात पाटील यांनी शेतकऱ्या संदर्भात सक्त सुचना दिलेल्या असतांना देखील दुर्लक्ष केले जात आहे असून याबाबत शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण दिसून येत आहे परिणामी सदरील नुकसानग्रस्त शेतकरी न्यायाच्या प्रतिक्षेत असून तालुक्यातील केळी पीक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे अशी आशा शेतकरी हिरामण रमेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.