खरीप हंगाम ई पीक पाहणी नोंदणीला १ ऑगस्ट पासून सुरुवात !! शेतकऱ्यांनी नोंदणी करून शेती लाभाच्या योजनांचा लाभ घेण्याचे महसूल विभागाकडून आवाहन !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२८ जुलै २५ सोमवार
राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी असून महाराष्ट्र सरकार महसूल विभागातर्फे यावर्षीची खरीप हंगाम २०२५ साठी ई-पीक पाहणी प्रक्रिया १ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होत आहे.सदरहू शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे व त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी वेळेत आपली ई-पीक पाहणी पूर्ण करून शासनाच्या शेती लाभाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र शासन महसूल विभागातर्फे उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे व तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी गजानन पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.
ई-पीक पाहणी का आवश्यक आहे?
ई-पीक पाहणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकांची अचूक नोंद शासनाच्या दप्तरी होणार असून या माहितीचा उपयोग विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी केला जाणार असल्यामुळे ई-पीक पाहणी न केल्यास शेतकऱ्यांना अनेक महत्त्वाच्या योजनांपासून वंचित राहावे लागू शकते.
पीक विमा मिळवण्यासाठी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक
पिकांचे नुकसान झाल्यास ई पीक पाहणीच्या नोंदीच्या आधारेच विम्याची रक्कम निश्चित केली जाते.परिणामी पीक नुकसान भरपाई,अतिवृष्टी,गारपीट किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाईसाठी ई-पीक पाहणीची नोंद आवश्यक आहे.तसेच शेतमालाला आधारभूत किंमत (हमीभाव) मिळवण्यासाठी ई-पीक पाहणी केलेली असणे गरजेचे आहे.त्याचबरोबर ॲग्रीस्टॅक अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनांचा आणि इतर शासकीय अनुदानांचा लाभ घेण्यासाठी सातबारा उताऱ्यावर पिकाची नोंद असणे आवश्यक आहे आणि ही नोंद ई-पीक पाहणीद्वारेच केली जाते.
ई-पीक पाहणी कशी करावी?
ई-पीक पाहणी प्रक्रिया अतिशय सोपी असून शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरून करू शकतात.यात नवीन ॲप डाउनलोड करा.तसेच या वर्षापासून ई-पीक पाहणीसाठी ‘DCS’ नावाचे नवीन मोबाईल ॲप्लिकेशन वापरण्यात येणार आहे.शेतकऱ्यांनी जुने ॲप डिलीट करून १ ऑगस्टपासून नवीन ॲप डाउनलोड करावे.ॲप डाउनलोड केल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यावर स्वतःची नोंदणी करून आपल्या शेतातील पिकांची माहिती भरायची आहे व यामध्ये पिकाचे नाव,लागवडीचे क्षेत्र आणि सिंचनाचा प्रकार यासारख्या बाबींचा समावेश असतो.
मदत आणि मार्गदर्शन
ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाही किंवा ज्यांना ही प्रक्रिया अवघड वाटते ते जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र,ग्रामपंचायत किंवा गावातील इतर डिजिटल सेवा केंद्रांची मदत घेऊ शकतात व काही अडचणी आल्यास ०२०-२५७१२७१२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
अंतिम मुदत आणि आवाहन
खरीप हंगाम २०२५ साठी ई-पीक पाहणी करण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत असण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेत आपली ई-पीक पाहणी पूर्ण करावी.वेळेवर नोंदणी न केल्यास अनेक शासकीय लाभांपासून वंचित राहावे लागू शकते.ई-पीक पाहणी हा शेतकऱ्यांच्या फायद्याचा उपक्रम असून यामुळे प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गती येण्यास मदत होणार आहे परिणामी सर्व शेतकऱ्यांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन शासनाच्या योजनांचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे व तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी गजानन पाटील यांनी केले आहे.