बऱ्हाणपूर–अंकलेश्वर महामार्ग भूसंपादनाची अधिसूचना जारी !! रावेर-यावल तालुक्यातील १ हजार ५० शेतकऱ्यांची जमीन संपादित होणार !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१९ ऑगस्ट २५ मंगळवार
गुजरात,महाराष्ट्र व मध्य प्रदेश या तीन राज्यांना जोडणाऱ्या बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी लागणारी जमीन भूसंपादित करण्याची अधिसूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातुन जारी करण्यात आली असून या अधिसूचनेनुसार जळगाव जिल्ह्यातील रावेर व यावल या दोघ तालुक्यातील तब्बल १ हजार ५० शेतकऱ्यांकडील ३४२.७८४ हेक्टर शेत जमिनी क्षेत्र भूसंपादित करण्यात येणार आहे.
दरम्यान या प्रक्रिये संदर्भात फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयातर्फे यापूर्वी वैयक्तिक हरकती मागविण्यात आल्या होत्या व त्यानुसार रावेर तालुक्यातील सुमारे ५०० ते ५५० शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात हरकती दाखल केल्या होत्या.तथापि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने संबंधित हरकतींचा विचार करून अखेरीस भू संपादनाची अंतिम अधिसूचना केंद्र शासनाच्या राजपत्रात दिनांक १३ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली आहे व ही कारवाई राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन अधिनियम १९५६ च्या कलम ३(क) अन्वये करण्यात आली आहे.या चौपदरीकरणामुळे या महामार्गावरील वाहतूक सुरळीत होणार असली तरी शेतकऱ्यांमध्ये मात्र जमिनीच्या मोबदल्यासंदर्भात समाधानकारक दर मिळतील का याबाबत संभ्रम व नाराजी कायम आहे.