Just another WordPress site

अंतर्नादच्या दातृत्वातून गणेशोत्सवाला सामाजिकतेची नवी ओळख-मुख्याध्यापक अमितकुमार पाटील यांचे प्रतिपादन !!

भुसावळ-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०५ सप्टेंबर २५ शुक्रवार

सण-उत्सवांना केवळ पूजा-अर्चा आणि उत्सवापुरते मर्यादित न ठेवता त्याला सामाजिकतेची जोड दिली पाहिजे तसेच समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याची भावना यातून जपली गेली पाहिजे.अंतर्नाद प्रतिष्ठानचा ‘एक दुर्वा समर्पण’ हा उपक्रम त्या दृष्टीने प्रेरणादायी आहे.दात्यांच्या सहकार्याने गरीब,गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा भागविण्याचे कार्य या माध्यमातून होत आहे व ही छोटीशी मदत विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा देऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवते आणि उद्या यांच्यातीलच कुणी समाजाला दिशा देणारा अधिकारी होईल असे प्रतिपादन एक दुर्वा समर्पण उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख व वाघळूद जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अमितकुमार पाटील यांनी केले आहे.

दरम्यान सालाबादाप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या निमित्ताने अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे “एक दुर्वा समर्पण” हा उपक्रम राबविण्यात आला.भुसावळ तालुक्यातील फेकरी जिल्हा परिषद शाळेत झालेल्या या कार्यक्रमात ५७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यात बालमित्र पुस्तके,वह्या,पाटी,पेन्सिल,पेन इत्यादी साहित्याचा समावेश होता.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सरपंच चेतना संजय भिरूड,सामाजिक कार्यकर्ते संजय भिरूड,सुनील भिरूड,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा रुकसाना बी.फकीर,नसीरशहा फकीर,सलमानशहा फकीर,साबीरशा फकीर,मुख्याध्यापक चंद्रकांत सूर्यवंशी,शिक्षिका प्रियंका कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक प्रकल्प समन्वयक अमितकुमार पाटील यांनी केले.आभार प्रदर्शन केतन महाजन यांनी मानले तर सूत्रसंचालन कपिल धांडे यांनी केले.गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून त्यातील बचतीतून हा उपक्रम राबविला जातो.दात्यांच्या स्वेच्छा योगदानातून उभारलेली ही मदत विद्यार्थ्यांना थेट पोहोचविली जाते.मागील आठ वर्षांपासून दरवर्षी पाच शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जात असून यंदा त्याचे नववे वर्ष आहे.यावेळी ग.स.सोसायटी सदस्य योगेश इंगळे,ज्ञानेश्वर घुले,कुंदन वायकोळे,अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील तसेच पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात शाळा व्यवस्थापन समिती व स्थानिक ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

Leave A Reply

Your email address will not be published.