यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०९ सप्टेंबर २५ मंगळवार
तालुक्यातील उंटावद-चिंचोली या ३.५ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची रुंदी वाढवण्यासह मजबुतीकरणाचे काम काही महिन्यापूर्वीच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत करण्यात आले होते.सदरहू अवघे काही महिने उलटत नाही तोच या रस्त्यावर भला मोठा खड्डा पडल्यामुळे सदरील कामाच्या गुणवत्तेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दरम्यान सदरील रस्त्याची रुंदी वाढवून रस्ता नवीन बनविण्यात आला होता व या संपूर्ण रस्त्याचे कामही चांगल्या प्रकारे झाले होते मात्र अवघ्या काही महिन्यातच चिंचोली बस स्थानकापासून खाली उतरतांना उंटावद रस्त्यावर नाल्यावरील पुलाजवळ भलामोठा खड्डा पडला आहे.परिणामी या ठिकाणी वाहनांना वापरण्यासाठी पर्यायी जागा नाही म्हणून याच खड्ड्यातून वाहनांचा वापर सुरू आहे त्यामुळे दिवसेंदिवस हा खड्डा मोठा होत आहे व वाहनधारकांना त्याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे अशा अवस्थेत या ठिकाणी वाहनाचा अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आहे. तरी संबंधित ठेकेदाराने या रस्त्यावर अपघात होण्या आधी पडलेल्या खड्ड्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारक व ग्रामस्थांकडून होत आहे.