शिंदे गटाच्या शिवसेनेला ग्रहण लागणार?राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांच्या वक्तव्याने खळबळ
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या काही आमदारांमध्ये नाराजी आहे त्यामुळे लवकरच शिंदे-फडणवीस सरकारला ग्रहण लागण्याची शक्यता आहे असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी काळ दि.२५ मंगळवार रोजी केला आहे.त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.विदर्भात अमरावतीमध्ये भाजप समर्थक आमदार रवी राणा आणि शिंदे गटाचे समर्थक आमदार बच्चू कडू यांच्यात राजकीय कलगीतुरा सुरू आहे तसेच जळगाव जिल्ह्यात पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील या शिंदे गटाच्या दोन लोकप्रतिनिधींमध्ये शाब्दिक आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.नव्या मंत्रीमंडळात काही आमदारांना मंत्रिपदाचे आश्वासन दिले पण मंत्रिपदासाठी वर्णी लागली नाही त्यामुळे शिंदे गटाच्या काही आमदारांमध्ये नाराजी आहे परिणामी काही आमदार शिंदे गटाला सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी यावेळी सांगितले.गुवाहाटीला जाऊन मोठे घबाड मिळविल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता त्या आरोपांबाबत बच्चू कडू यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात राणा यांच्या विरोधात बदनामीची तक्रार दिली आहे.
राज्य सरकारने शंभर रुपयांत दिवाळीसाठी आनंद शिधा देण्याची घोषणा केली होती.मात्र या योजनेत सुरुवातीपासूनच गोंधळ असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे होते.या योजनेत एक लिटर पाम तेलाचे पाकीट दिले जात आहे त्याची निर्मिती सन २०१९मध्ये झाली आहे.राज्य सरकारने घाईगडबडीत कंत्राट दिले पण तीन वर्षांपूर्वीचे जुने पाम तेल गोरगरिबांच्या माथी मारले जात आहे असा दावा करून या प्रकाराची अन्न व नागरी पुरवठामंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणी महेश तपासे यांनी केली आहे.