Just another WordPress site

ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याच्या बहाण्यातून चोरट्याने पावणेसहा लाख रुपये लांबविले !

पुणे-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

एटीएम केंद्रात रोकड काढण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याचा बहाणा करून चोरट्याने त्यांच्या खात्यातून पावणेसहा लाख रुपयांची रोकड लांबवली.चोरट्याने मदतीच्या बहाण्याने ज्येष्ठाचे डेबिट कार्ड चोरून बँक खात्यातून वेळोवेळी रोकड लंपास केल्याचे समोर आले आहे.संबंधित ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.तक्रारदार शनिवार पेठेत वास्तव्यास असून ते शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत.११ ऑक्टोबर रोजी ते बाजीराव रस्त्यावरील दक्षिणमुखी मारुती मंदिर समोरील ‘बँक ऑफ बडोदा’च्या एटीएम केंद्रात रोकड काढण्यासाठी गेले होते त्या वेळी चोरटा एटीएम केंद्राच्या परिसरात थांबला होता.ज्येष्ठ नागरिक एटीएममधून पैसे काढत होते त्यावेळी चोरटा एटीएममध्ये आला व  मदत करण्याचा बहाणा करून त्याने हातचलाखीने ज्येष्ठ नागरिकाचे डेबिट कार्ड चोरले व त्याऐवजी त्यांना दुसरे डेबिट कार्ड दिले.चोरट्याने मदतीच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाकडून एटीएम व्यवहाराचा सांकेतिक क्रमांक घेतला त्यानंतर चोरट्याने दहा ते बारा दिवसांत वेळोवेळी बँक खात्यातून पाच लाख ७९ हजार रुपये काढले.बँक खात्यातून पैसे काढल्याचे संदेश आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांकडे तक्रार दिली.याबाबत पोलिस उपनिरीक्षक वर्षाराणी सुतार पुढील तपास करीत आहेत

‘अनोळखी लोकांना एटीएम कोड व पासवर्ड बाबत माहिती देऊ नका’-पोलीस प्रशासन  
प्रत्येक बँकेचे एटीएम मशिन वेगळे असल्याने ज्येष्ठ नागरिकांना पैसे काढताना अडचणी येतात त्यामुळे त्यांना तेथील सुरक्षारक्षक किंवा रांगेत थांबलेल्या नागरिकांची मदत घ्यावी लागते.एटीएम केंद्राच्या परिसरात चोरट्यांचा वावर असतो.ज्येष्ठांना पैसे काढताना अडचण येते याची कल्पना असल्याने चोरटे मदतीच्या बहाण्याने कार्डची माहिती घेऊन कार्ड आणि पैसे लांबवतात.चोरट्याने बँक खात्यातून रोकड लांबविल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत.यापार्श्वभूमीवर पैसे काढताना ओळखीच्या व्यक्तीला सोबत घेऊन जावे तसेच अनोळखी लोकांना बँकेशी संबंधित खासगी माहिती जसे की एटीएम कोड किंवा पासवर्ड बाबतची माहिती देऊ नका असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.