परभणी-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
परभणी शहरातील प्रियदर्शनी नगरामधील एका घरातून दुर्गंधी येत होती त्यामुळे नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली.पोलिसांनी जाऊन पाहणी केली असता घरात ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे हा प्रकार पाहून पाहणीसाठी गेलेले पोलीसदेखील चक्रावले आहेत.गंपुबाई कोंडिबा दिपके असे मयत महिलेचे नाव आहे.घटनास्थळाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली असून महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला?याचा शोध पोलीस प्रशासनाकडून घेतला जात आहे.परभणी शहरातील प्रियदर्शनी नगरामध्ये गंपुबाई कोंडीबा दिपके या भाड्याच्या घरामध्ये राहत होत्या.चार ते पाच दिवसांपासून त्या घराबाहेर आल्या नाहीत अखेर आज शेजारी राहणाऱ्या नागरिकांना घरामधून दुर्गंधी येत असल्याने त्यांनी याची माहिती नवा मोंढा पोलिसांना दिली.घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार,नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिपान शेळके,स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण,पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता गंपुबाई कोंडीबा दिपके यांचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत आढळून आला आहे.
यावेळी पोलिसांनी पाहणी केली असता गंपुबाई दिपके यांच्या मृतदेहाच्या बाजूला घरातील साहित्य पडले असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी मयत महिलेची ओळख पटवून हट्टा येथील नातेवाईकांना घटनेची माहिती दिली आहे.दरम्यान हा घातपात आहे की इतर काही याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.महिलेचा मृतदेह खूप कुजला असल्याने जागेवरच मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.सदरील घटनेचा अधिक तपास नवा मोंढा पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परभणी पुन्हा एकदा हादरली आहे.