नाशिक-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
दिंडोरी रोडवरील मेरी शासकीय वसाहतीत बेशुद्ध अवस्थेत असलेल्या जलसंपदा विभागाच्या कनिष्ठ लिपिकाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत्यू झाल्याची माहिती दिली होती त्यानंतर शवविच्छेदनाच्या अहवालातून गळा आवळून खून केल्याची धक्कादायक बाब उघड झाली यामुळे संपूर्ण मेरी शासकीय वसाहतीत एकच खळबळ उडाली होती याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता या अनुषंगाने पोलिसांनी तपासाला सुरुवात करत अवघ्या बारा तासांत संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,जलसंपदा विभागाच्या जलद गती कार्यालयातील कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असणाऱ्या संजय वसंतराव वायकांडे (३८,रा.मेरी वसाहत नाशिक)यांचा खून झाला होता.या प्रकरणात पोलिसांनी मृत व्यक्तीचे काका संशयित निवृत्ती हरी कोरडे (वय ५९, रा. लाखोटे मळा, इंदोरे,ता.दिंडोरी,जि. नाशिक) यांना ताब्यात घेतले.पोलिसांनी केलेल्या तपासात संशयित निवृत्ती हरि कोरडे यांनी मृत संजय वायकंडे हे झोपेत असताना मोबाईलच्या चार्जरने गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.संशयित आरोपी हे त्यांच्या शेतातील घेवडा विकण्यासाठी नाशिकमधील भाजी मार्केट मध्ये आले होते त्यांना घरी जाण्यास उशीर झाल्याने घरी जाण्यासाठी कोणतेही वाहन नव्हते म्हणून काका निवृत्ती हरी कोरडे हे मयत व्यक्तीच्या घरी गेले होते.दरम्यान दोघांनी जेवण करून दारूचे देखील सेवन केले होते यावेळी मयत संजय वायकंडे यांच्या पत्नी दोन मुलांसह दिवाळीसाठी माहेरी गेल्या होत्या.जेवण झाल्यानंतर संशयित आरोपी निवृत्ती हरी कोरडे यांनी मयत व्यक्तीकडे ३-४ महिन्यांपूर्वी दिलेले उसने २००० रुपये मागितले यावरून त्यांच्यात वाद झाला या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.त्यानंतर मयत संजय वायकंडे हे झोपेत असताना काकाने मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला.त्यानंतर सकाळी ७ वाजता संशयित आरोपी निवृत्ती हरी कोरडे हे त्यांच्या मूळ गावी इंदोरे येथे निघून गेले अशी माहिती पोलिसांनी दिली.पंचवटी पोलिसांनी या प्रकरणातील संशयित काकाला अटक केली आहे.