मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
शहरातील घाटकोपर परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना पुढे आली आहे.येथे मॉलमध्ये घसरगुंडीवर खेळताना एका साडेतीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला आहे.घाटकोपरच्या नील योग मॉलमध्ये किड्स झोनमध्ये खेळत असताना तोल जाऊन या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.दालिशा करण वर्मा ही आई-वडिलांसोबत घाटकोपरमधील नील योग मॉलमध्ये गेली होती.तिथे किड्स झोन झेनोक्स प्ले स्पेस याठिकाणी ती खेळण्यासाठी गेली.किड्स झोनमध्ये घसरगुंडीचा आनंद लुटत असताना अचानक तिचा तोल गेला आणि ती खाली पडली या घटनेत तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ती बेशुद्ध पडली तिच्या मेंदूतून रक्तस्त्राव होत असल्याचे लक्षात येताच तिला तात्काळ मुलुंडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टर तिच्यावर उपचार करतील त्यापूर्वीच या चिमुकलीने जीव सोडला.
साडेतीन वर्षांची दालिशा वर्मा ही चेंबूरच्या टिळकनगर परिसरात राहत होती ती तिच्या आई-वडिलांसह घाटकोपरच्या नील योग मॉलमध्ये गेली होती जिथे ही दुर्घटना घडली आहे.या घटनेने दालिशाच्या पालकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.आपली चिमुकली डोळ्यादेखत गेल्याने त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीयेत त्यामुळे आपल्या मुलांची काळजी घ्या.ते कुठे खेळत आहेत,ते सुरक्षित आहेत का?याची खात्री करा.